मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा हक्क दिनानिमित्त सेवा प्रमाणपत्र वितरण समारंभाचे आयोजन दिनांक ६ मे २०२५ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन (नगरभवन) येथे करण्यात आले. या सोहळ्यात मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राधाबिनोद शर्मा (भा.प्र.से.) यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध सेवा प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त कल्पिता पिंपळे, उपायुक्त प्रसाद शिंगटे तसेच इतर अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाने सन २०१५ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची अंमलबजावणी सुरू केली. या अधिनियमांतर्गत मिरा-भाईंदर महानगरपालिका सध्या ६५ शासकीय सेवा नागरिकांना वेळेत व पारदर्शक पद्धतीने देत आहे. या अधिनियमाच्या दशकपूर्तीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात नागरिकांना सेवा प्रमाणपत्रांचे वितरण व उत्कृष्ट सेवा देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात आयुक्तांच्या हस्ते जन्म नोंदणी प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, कर विभाग प्रमाणपत्र, अग्निशमन विभाग प्रमाणपत्र, नगररचना विभाग प्रमाणपत्र यांचे वितरण करण्यात आले. या सोहळ्यात एकूण १२२ प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यामध्ये विवाह नोंदणी विभाग, मालमत्ता विभाग, परवाना विभाग आणि माहिती व तंत्रज्ञान विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
प्रमाणपत्र वितरणावेळी विवाह नोंदणी विभागाचे डॉ. नंदकिशोर लहाने – उपनिबंधक, श्रीमती संगीता पाठक – लिपिक व बालवाडी शिक्षिका, श्रीमती रविना गावंड – संगणक चालक यांना गौरवण्यात आले. तसेच मालमत्ता विभागातील श्री. दत्तात्रय वरकुटे – सहा. आयुक्त, श्री. प्रशांत पाटील – कर निरीक्षक, श्री. भरत राऊत – लिपिक, परवाना विभागातील श्री. किरण जाधव – लिपिक, श्रीमती रेखा पाटील – लिपिक यांनाही प्रमाणपत्र देण्यात आले.
माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल विभागप्रमुख श्री. राजकुमार घरत यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच, प्रशासकीय विभागाच्या प्रभावी नियंत्रणामुळे आणि अहवाल सादरीकरणातील उत्कृष्ट कार्याबद्दल सामान्य प्रशासन विभागातील श्री. सुनील यादव – सहा. आयुक्त, श्री. उन्मेष नाईक – लिपिक, श्री. हेमंत धुरी यांनाही गौरवण्यात आले.
कार्यक्रमाच्या समारोपात आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी उपस्थित नागरिकांचे आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करताना महानगरपालिकेच्या सेवांमधील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि नागरिकांप्रती असलेली जबाबदारी यावर भर दिला. त्यांनी भविष्यात अशा प्रकारचे उपक्रम राबवून अधिकाधिक नागरिकांना सेवा देण्याचा निर्धार व्यक्त केला.