■ प्रतिनिधी, मुंबई – काळाचौकी येथील अभ्यूदय नगर वसाहतीच्या पुनर्विकासाच्या मार्गात म्हाडाने काही जाचक अटी लादल्याने अडचणी येत होत्या. ६३५ चौ. स्क्वे. फुटाच्या घरांसाठी तब्बल ७ वेळा निविदा काढण्यात आल्या. मात्र विकासकांनी त्याकडे पाठ फिरवली होती. या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथी गृह येथे भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांच्या पुढाकाराने बैठक पार पडली. या बैठकीत निविदा प्रक्रियेची कोंडी फोडण्यात आली. ६३५ चौ. फुटाऐवजी ६२० चौ. फुटाप्रमाणे नवीन निविदा काढण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले.
या बैठकीला भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांच्यासह शिवडी मतदारसंघाचे आ. अजय चौधरी, माजी मंत्री आणि मनसे नेते बाळा नांदगावकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांसह अभ्यूदय नगर फेडरेशनचे नंदकुमार काटकर, विलास सावंत अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर बोलताना आ. प्रविण दरेकर म्हणाले कि, अभ्यूदय नगरला कामगार वर्ग आहे. मध्यमवर्गीय मराठी लोकं तेथे मोठ्या प्रमाणावर राहतात. ६० वर्ष त्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न प्रलंबित होता. अनेक प्रयत्न झाले. गेल्यावेळी सह्याद्री अतिथी गृह येथे बैठक घेऊन ६३५ चौ. स्क्वे. फुटाचा निर्णय केला होता. ६३५ च्या निर्णयाने निविदा काढल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पहिले कन्स्ट्रक्शन ॲण्ड डेव्हलपमेंट एजन्सी (सी अँड डी) जाहीर केले. तो अभ्यूदय नगर वासियांना सुखद धक्का होता. ६३५ च्या एक-दोन वेळा नाही तर ७ वेळा निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या, मात्र विकासकांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितले कि, म्हाडाच्या काही जाचक अटी आहेत त्यामुळे निविदेला प्रतिसाद मिळत नाही. मुख्यमंत्र्यांनी प्रीमियम, स्टॉक संदर्भात जेवढ्या काही सवलती देण्यात येतील त्या देण्याचा निर्णय केला, असेही दरेकर म्हणाले.
दरेकर पुढे म्हणाले कि, आज ६३५ चौ. स्क्वे. फुटाची जी कॅप होती ती ६२० चौ. स्क्वे. फुटावर करण्याचा सुवर्णमध्य काढण्यात आला. त्यामुळे अभ्यूदय नगरच्या पुनर्विकासाला गती मिळणार आहे. तसेच रहिवाशांना देण्यात येणाऱ्या २० हजार घरभाडे संदर्भात अभ्यूदय नगर फेडरेशनच्या लोकांचा आग्रह होता. मुख्यमंत्र्यांनी सांगितले घरभाड्याबाबतीत मी पुनर्विचार करतो, कॉर्पस फंडबाबतीत काही करता येणार नाही, कारण हा सर्वात जास्त कॉर्पस आहे. त्यामुळे प्राप्त परिस्थितीत अभ्यूदय नगरवासियांना अत्यंत दिलासा देणारा हा निर्णय आहे. खऱ्या अर्थाने आज अभ्यूदय नगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाने आनंदोत्सव साजरा केला जाईल, असा विश्वासही दरेकर यांनी बोलताना व्यक्त केला.