मुंबई- श्रीराम नवमीनिमित्त मागाठाणे विधानसभा क्षेत्रात भाजपा गटनेते आ. प्रवीण दरेकर यांचे चिरंजीव डाॅ. यश प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या एकदंत सेवाभावी संस्थेतर्फे प्रथमच भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. या शोभा यात्रेत उत्तर मुंबईचे लोकप्रिय खासदार व केंद्रीय मंत्री पियुष गोयल सहभागी झाले होते. यावेळी प्रभू श्रीरामाप्रमाणे गरीब, पीडित, शोषितांना चांगले जीवन मिळण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन खा. पियुष गोयल यांनी केले.
यावेळी उपस्थित रामभक्तांना शुभेच्छा देत खासदार पियुष गोयल यांनी म्हटले की, मला पूर्ण विश्वास आहे की अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मस्तकावर जो सूर्य टीळक झाला तसाच आपल्या सर्वांच्या कुटुंबावर सूर्य देवाचा व प्रभू श्रीरामाचा सदैव आशीर्वाद राहील. प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुख, समृध्दी, उज्ज्वल भविष्य मिळेल. प्रभू श्रीराम भारताची आस्था आहेत, आपल्या जीवनाचा मार्ग आहेत. गरीब, पीडित, शोषितांना चांगले जीवन कसे मिळेल यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू. मला विश्वास आहे आपल्या सर्वांच्या साथीने मागाठाणे आणि उत्तर मुंबईला उज्ज्वल भविष्य देण्यास आम्ही यशस्वी होऊ, असेही खा. गोयल म्हणाले.
दरम्यान, एकदंत सेवाभावी संस्थेतर्फे मागाठाणे विधानसभा क्षेत्रात ढोल-ताशाच्या निनादात, फटाक्यांच्या आतिषबाजीत निघालेल्या या शोभा यात्रेत बाईकवर स्वार होऊन, डोक्याला फेटा बांधून हजारोंच्या संख्येने श्रीराम भक्त सहभागी झाले होते. श्री पुष्टीपती गणपती मंदिर येथून सुरू झालेल्या या शोभा यात्रेची सांगता श्री. हनुमान मंदिर येथे झाली. ही शोभा यात्रा यशस्वी करण्यासाठी एकदंत सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. यश प्रविण दरेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
याप्रसंगी सोशल मीडिया इंफ्लूऐसर्स विशाल फाले, सोनाली सोनावणे, तृप्ती राणे, जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर, महामंत्री कृष्णकांत दरेकर, ललित शुक्ला, मागाठाणे युवा मोर्चा अध्यक्ष अमित उतेकर, महिला मोर्चा अध्यक्षा रश्मी भोसले यांसह मोठ्या संख्येने मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील महिला-पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रामभक्त उपस्थित होते.