• “घरो घरी नर्सरी, घरो घरी वसुंधरा, घरो घरी माझी वसुंधरा” तयार करण्याचे मा. आयुक्त यांचे आवाहन.
भाईंदर (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने “माझी वसुंधरा” अभियान हे सुरू केलेले एक व्यापक उपक्रम आहे. जे निसर्गाच्या पाचही घटकांवर (पृथ्वी, पाणी, हवा, ऊर्जा आणि आकाश) लक्ष केंद्रित करते. ज्यामुळे पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छता यावर भर दिला जातो. या वर्षी देखील महाराष्ट्र शासनाच्यावतीने “माझी वसुंधरा 5.0” अभियान राबवित आहे. त्यास अनूसरून या वर्षी देखील मिरा भाईंदर शहरात हा अभियान मिरा भाईंदर महानगरपालिका मा. आयुक्त तथा प्रशासक राधाबिनोद शर्मा (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागामार्फत “वसुंधरा महोत्सव २०२५” म्हणून साजरा करण्यात येत आहे. वसुंधरा महोत्सव २०२५ अंतर्गत दि. ०४ एप्रिल २०२५ रोजीपासून ते दि. 6 एप्रिल 2025 या दिवसात विविध उपक्रम व कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. सदर महोत्सवाचा शुभारंभ आज दि.०४ एप्रिल २०२५ सायंकाळी स्व. बाळासाहेब ठाकरे मैदान, इंद्रलोक भाईंदर (पू.) येथे मा. आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाबिनोद शर्मा (भा.प्र.से.) यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या प्रसंगी अति. आयुक्त डॉ. श्री. संभाजी पानपट्टे, उपायुक्त (मुख्यालय) श्रीम. कल्पिता पिंपळे, उपायुक्त श्री.प्रसाद शिंगटे, शहर अभियंता श्री. दिपक खांबित, महानगरपालिकेच्या विविध विभागाचे विभागप्रमुख, माजी नगरसेवक/नगरसेविका, अधिकारी/कर्मचारी व शहरातील पर्यावरण स्नेही नागरिक उपस्थित होते.
या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी वृक्षाचे महत्व पटवून देण्यासाठी व शहरातील नागरिकांमध्ये जागरूकता आणण्यासाठी सर्वप्रथम ढोल तशाच्या गजरात वृक्षदिंडी काढण्यात आली. त्यानंतर मा. आयुक्त तथा प्रशासक यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करून दिप प्रज्वलन करन राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत पांडुरंगाला वंदन करून कार्यक्रमाच्या सूरूवातीस उपस्थित मान्यवर व नागरिकांनी एकत्रित हरीत वसुंधरेची शपथ घेतली. त्यानंतर शिव शंभो मर्दानी आखाडाच्या विद्यार्थिनींनी व विद्यार्थ्यांनी लाठीकाठी मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक दिले. उपायुक्त (मुख्यालय) श्रीम. कल्पिता पिंपळे यांनी उपस्थितांसमोर संपूर्ण महोत्सवाची प्रस्ताविका व रूपरेषा मांडली. त्यानंतर अति. आयुक्त डॉ. श्री. संभाजी पानपाट्टे यांनी मिरा भाईंदर शहरातील नागरिकांना मिरा भाईंदर शहर ऐकल प्लास्टिक मुक्त करण्यासाठी योगदान करण्याचे व मिरा भाईंदर महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन केले. पर्यावरण व संस्कृती संवर्धनाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील लोकधारेच्या आधारावर लोकनृत्य, सांस्कृतिक व कलात्मक कार्यक्रम सादर करण्यात आले. या सोबत पर्यावरणपूरक वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्र उभारण्यात आले आहे. या प्रदर्शनात व विक्री केंद्रांवर औषधी वनस्पती, बी-बियाणे रोपे, नर्सरी, आयुर्वेदिक व सौंदर्य उत्पादने, हस्तकला व हॅण्डलुम उत्पादने, विविध प्रकारचे अलंकार, खाद्यसंस्कृती, पर्यावरण संवर्धन प्रकल्प जसे की, सोलार सेल्स, सोलार बॅटरी, EV चार्जिंग पॉइंट्स, रेन वॉटर हार्वेस्टिंग इत्यादी श्रेणीतील वस्तू उपलब्ध करण्यात आले. या विक्री केंद्रांना मा. आयुक्त तथा प्रशासक व उपस्थित मान्यवर यांनी भेट दिले व त्यांचा आढावा घेऊन त्यांची माहिती घेतली. सदर विक्री केंद्रे शहरातील नागरिकांकरीता या 03 दिवासाच्या महोत्सव कालावधीत सकाळी 10.00 ते रात्री.10.00 दरम्यान खुले राहणार आहे. दि. 05 एप्रिल 2025 रोजी सकाळी 7.00 ते 9.00 वाजेपर्यंत चित्रकला स्पर्धा तर सायं. 6.00 ते रात्री 10.00 वाजेपर्यंत महिलांसाठी विशेष होम मिनिस्टर, खेळ पैठणीचा कार्यक्रम व शालेय विद्यार्थी/कर्मचारी/महिला बचत गट यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आणि दि. 06 एप्रिल 2025 रोजी सकाळी 6.00 ते 10.00 वाजेपर्यंत किल्ला सायक्लोथॉन (मार्ग – सुभाषचंद्र बोस मैदान ते जंजिरा धारावी किल्ला ते मॅक्सस मॉल पोलिस चौकी ते सुभाषचंद्र बोस मैदान) तर सायं. 6.00 ते रात्री. 10.00 वाजेपर्यंत बक्षिस वितरण कार्यक्रम व “गाणे तुमच्या आमच्या मनातले” या संगीत संध्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पंचतत्वावर आधारित असलेल्या मूल्यांच्या माहितीची जनजागृती करणे. शहरातील नागरिकांनी पर्यावरण, निसर्ग याविषयी संवेदनशील बनविणे आणि नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन करण्यासाठी उद्दुक्त करणे आणि नागरिकांनी एकत्र येऊन पर्यावरणपूरक कामांमध्ये सक्रिय सहभाग घेणे. हा या वसुंधरा महोत्सवाचा मुख्य हेतू आहे.
मिरा भाईंदर महानगरपालिकेने दिनांक ०४, ०५ आणि ०६ एप्रिल २०२५ रोजी आयोजित केलेल्या वसुंधरा महोत्सवात शहरातील पर्यावरण स्नेही नागरिकांनी भेट द्यावी व पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अंगिकार करावा व मिरा भाईंदर शहरात “घरो घरी नर्सरी, घरो घरी वसुंधरा, घरो घरी माझी वसुंधरा” तयार करण्याचे आवाहन मा. आयुक्त तथा प्रशासक राधाबिनोद अ. शर्मा यांच्या वतीने करण्यात येत आहे.