मिरा-भाईंदर तसेच वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पोलीस ठाण्यांमध्ये नागरिकांसाठी नाविन्यपूर्ण क्युआर कोड आधारित अभिप्राय प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे नागरिकांना आपल्या अनुभवाचे तात्काळ मूल्यांकन करता येणार आहे. मुख्यमंत्री यांच्या १०० दिवस कृती आराखड्याच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत आणि मा. पोलीस आयुक्त, मुंबई शहर वाहतूक विभाग यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला आहे.
कशा प्रकारे कार्य करेल ही प्रणाली?
प्रत्येक पोलीस ठाण्यात दर्शनी भागात क्युआर कोड असलेली स्टॅन्डी (फलक) लावण्यात येणार आहे. नागरिकांनी हा क्युआर कोड स्कॅन केल्यावर त्यांना एक ऑनलाइन फॉर्म प्राप्त होईल. या फॉर्ममध्ये नागरिकांना आपले नाव, मोबाईल क्रमांक आणि पोलीस ठाण्यातील अनुभव यासंबंधी माहिती भरता येईल.
या अभिप्राय फॉर्ममध्ये नागरिकांना पुढील मुद्द्यांवर आधारित प्रश्न विचारले जातील:
- पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची वर्तणूक
- पोलीस ठाण्यातील स्वच्छता व सुविधा
- समस्येवर तात्काळ तोडगा मिळाल्याचा अनुभव
- अन्य सुधारणा किंवा सूचना
उपक्रमाचा उद्देश
हा उपक्रम नागरिक आणि पोलिसांमधील संबंध अधिक दृढ करणे, पोलीस ठाण्यातील सेवा पारदर्शक बनवणे आणि नागरिकांना सोयीस्कर सेवा पुरवण्याच्या हेतूने राबवण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना पोलीस ठाण्यातील कार्यप्रणालीबद्दल थेट अभिप्राय देण्याची संधी मिळेल, तसेच पोलीस प्रशासनास त्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी आवश्यक माहिती मिळेल.
पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी सांगितले की, हा उपक्रम मीरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये लागू करण्यात येणार आहे. त्यांनी नागरिकांना या प्रणालीचा अधिकाधिक उपयोग करण्याचे आवाहन केले आहे.
या उपक्रमाचे फायदे:
- नागरिकांचा पोलीस ठाण्याशी संवाद सुलभ व पारदर्शक होईल.
- सेवांमध्ये सुधारणा करण्यास मदत होईल.
- नागरिकांना तक्रारी व सूचनांसाठी जलद सुविधा मिळेल.
- पोलिस व नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ होईल.
या प्रणालीमुळे पोलीस ठाण्यांतील सेवा अधिक लोकाभिमुख होतील आणि नागरिकांना सुरक्षित व सोयीस्कर अनुभव मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.