मुंबईत नकली माथाडींच्या गँगवॉरवाल्या टोळ्या कार्यरत त्यांना लगाम घालण्याचे काम कायद्याद्वारे होणे गरजेचे भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांचे विधान

मुंबई- मुंबईत नकली माथाडींनी, नकली युनियनवाल्यांनी हैदोस घातलाय. काही गँगवॉरवाल्या टोळ्या यात कार्यरत आहेत. एका बाजूला चांगला विचार करत असताना ज्या वाईट प्रवृत्ती यात घुसल्याहेत त्यांना लगाम घालण्याचे काम या कायद्याद्वारे होणे गरजेचे आहे, असे विधान भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी सभागृहात माथाडी कामगारांच्या बिलावर बोलताना केले. तसेच हे बिल आणून माथाडींना संरक्षित कसे करता येईल व ज्या अपप्रवृत्ती आहेत त्या कशा बाहेर ठेवता येतील असा प्रयत्न या बिलाच्या माध्यमातून सरकारचा दिसत असल्याचेही दरेकर म्हणाले.
आ. दरेकर म्हणाले कि, ओझी उचलून श्रमाचे काम करणारा माथाडी कामगार आहे. त्यांना काम मिळावे, काम संरक्षित व्हावे, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना व्हाव्यात अशी व्यवस्था या कायद्याद्वारे होती. कामगार हा विषय समाजासाठी अत्यंत महत्वाचा आहे. कामगारांविषयी कायदा बनत असताना गांभीर्याने सर्वांनी यामध्ये सहभाग घेऊन चर्चा झाली पाहिजे. परंतु माथाडींचा कायदा संरक्षित करत असताना अंगमेहनतीची कामे करणारा अशी अट दिलेली आहे ती महत्वाची आहे.
मुंबईत नकली माथाडींनी, नकली युनियनवाल्यांनी हैदोस घातलाय. एका बाजूला चांगला विचार करत असताना ज्या वाईट प्रवृत्ती यात घुसल्या आहेत त्यांना लगाम घालण्याचे काम या कायद्याद्वारे होणे अपेक्षित आहे. मुंबईमध्ये काही गँगवॉरवाल्या टोळ्या यात काम करताहेत. अण्णासाहेब पाटील यांचा उद्देश अशा प्रकारचा नव्हता. तर जो ओझं उचलून कष्ट करतो त्याला हमखास काम मिळावे, कायद्याद्वारे काम संरक्षित करावे या उद्देशाने कायदा झालेला. परंतु कायद्याची पूर्णपणे ऐशीतैशी झालीय. दुसऱ्याने थेट मुंबईत मालसुद्धा आणायचा नाही एवढी दादागिरी सुरू आहे. त्यालाही वेसन घालण्याची गरज असल्याचे दरेकर म्हणाले.

माथाडींचे बोर्ड सशक्त केले पाहिजे

देशाला जे-जे दिशादर्शक दिलेय ते महाराष्ट्राने दिलेय. रोजगार हमी योजनेचा कायदा आला. देशभरात हा कायदा लागू झाला. महाराष्ट्राचा आदर्श देशाने घेतलाय. माथाडीमध्ये काही दोष असतील तर ते काढले पाहिजेत. माथाडीना ताकद देण्याचे काम राज्यकर्त्यांनी केलेय. काँग्रेसच्या नेत्यांनी गर्दी जमवण्यासाठी माथाडीचा उपयोग केला. माथाडीचे वेगवेगळे बोर्ड आहेत. त्या बोर्डाचेही पुनर्विलोकन करण्याची गरज आहे. ते बोर्ड जर सशक्त केले नाहीत तर माथाडीच्या कुठल्याच विषयाला अर्थ राहणार नाही. त्याही बोर्डाचे मूल्यमापन करा, जेणेकरून त्यांचे जीवनमान उंचावू शकते, असेही दरेकर म्हणाले.

घरांसाठी माथाडींना मुंबई बँकेने अर्थसहाय्य केले
आ. दरेकर म्हणाले कि, माथाडी कामगारांसाठी अनेक योजना आहेत. माथाडीनी स्वतः उभे केलेले हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलमधून चांगल्या सेवा दिल्या जाताहेत. माथाडीना सरकारने घरासाठी भूखंड दिला होता. परंतु कायदेशीर काम करत असल्याचा पुरावा नसल्याने त्या ठिकाणी ते आपली घरे बांधू शकत नव्हती. भूखंड वर्षानुवर्षे तसाच पडून होता. अखेर आम्ही निर्णय घेतला मुंबई बँकेमार्फत दीडशे-दोनशे कोटींचे कर्ज दिले. आज ऐरोली येथे माथाडीची सगळी घर उभी राहिली आहेत.
माथाडींसाठी हे बिल फायदेशीर ठरेल
आज एआयवर सभागृहात चांगली चर्चा झाली. परंतु एआय येत असताना ओझं उचलणारा, काम करणारा कामगार आहे त्यांचाही विचार होणे गरजेचे आहे. जे खरे माथाडी आहेत त्यांना संरक्षित करा, त्यांना ज्या ज्या सवलती द्यायच्या आहेत त्या द्या. ज्या मोठमोठ्या टोळ्या मुंबईत कार्यरत आहेत त्यावर पोलीस प्रशासन आणि शासनाने एकत्रित बसून मार्ग काढावा. याआधी शरद पवारांनी माथाडींना राजाश्रय दिला, अजित पवार यांनी लक्ष घातले. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माथाडींना सरकारच्या माध्यमातून ज्या गोष्टी हव्या असतात त्या पूर्ण करण्याचे आश्वासन देतात. माथाडींसाठी हे बिल फायदेशीर ठरेल, असा विश्वासही दरेकरांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *