परभणी : १९५६ च्या नंतर समाजास आंबेडकरी ओळख प्राप्त झाली. ती नीतिमत्तेच्या बळावर टिकवणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रा. डॉ. प्रकाश मोगले यांनी केले. अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. प्रकाश मोगले यांचा परभणी शहरात महात्मा फुले कॉलनी येथे नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, मताचा सौदा करणारे चळवळीचे दलाल आहेत अशा लोकांना नेते कसे म्हणता येईल असा प्रश्न उपस्थित करून ते पुढे म्हणाले की जयभीम हा केवळ उच्चार नाही तर तो पात्रता पूर्ण अंगिकारून बुद्ध आणि बाबासाहेबांना प्रामाणिक राहण्याचा मूलमंत्र आहे. आंबेडकरी चळवळीची मांडणी करणाऱ्या साहित्यकांनी राजकीय भूमिका घेतली पाहिजे. यातूनच नैतिकतेची चळवळ उभी राहते त्यामुळे आपल्या आंबेडकरी वस्त्यांचा धाक राहील. कोंबिग ऑपरेशन करण्याची कुणाची हिम्मत होणार नाही आपला दरारा असावा, असेही ते म्हणाले. तर हा सन्मान केवळ आंबेडकरवादी अंकुर पेरणाऱ्या साहित्यकाचा असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रख्यात साहित्यिक डॉ. कीर्तीकुमार मोरे यांनी केले.
प्रारंभी तथागत गौतम बुद्ध डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा पूजन नंतर म फुले कॉलनीचे महत्व प्रास्ताविकेत यशवंत मकरंद यांनी विषद केले. विचार मंचावर ज्येष्ठ कवी आदिनाथ इंगोले, विद्रोही कवी लेखक प्रेमानंद बनसोडे, डॉ बी टी धुतमल, डॉ प्रकाश डाके, सुरेश हिवराळे बाबा कोटंबे, डॉ भिमराव खाडे, आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अनिता सरोदे यांची महिला तक्रार निवारण समितीवर जिल्हा अध्यक्ष तर सदस्यपदी आशाताई खिल्लारे यांची निवड झाल्याबद्दल व दिल्ली येथे पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रियंका उबाळे व संविधान शिल्पविषयी प्रशासनासमोर बाजू मांडणाऱ्या कचरूदादा गोडबोले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन विश्वजीत वाघमारे यांनी केले . भूमिका प्रा. डॉ. सुरेश शेळके यांनी मांडली तर आभार संजय बगाटे यांनी मानले.