भाईंदर: आलिशान चारचाकी वाहने चोरणाऱ्या एका मोठ्या टोळीला पकडण्यात भाईंदर पोलिसांना यश आले आहे. मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून तब्बल ५९ लाख रुपये किमतीच्या ५ महागड्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
१५ लाखांच्या महिंद्रा थार चोरीप्रकरणी कारवाई
दिनांक ५ मार्च २०२५ रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते ६ मार्चच्या सकाळी ९ वाजेपर्यंत दरम्यान भाईंदर (प) येथे राहणाऱ्या मनिषा शांतीलाल जैन (वय ४५) यांनी आपल्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये महिंद्रा थार (क्रमांक MH-02-FR-7884) ठेवली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी त्या जागेवर कार दिसली नाही.
याबाबत त्यांनी तात्काळ भाईंदर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी कलम ३०३(२) नुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणातून आरोपी गजाआड
गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर मिळालेल्या गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चोरीला गेलेली गाडी बिहारमधील बक्सर जिल्ह्यात असल्याचे निष्पन्न झाले.
पोलीस पथकाने तात्काळ बिहारमध्ये धाड टाकून आरोपी अभिषेक अरविंद सिंग (वय २५, रा. मंजरीचा, ता. बक्सर, जि. बक्सर, बिहार) याला अटक केली.
५ महागड्या गाड्या जप्त, दोन गाड्यांचे क्रमांक बदललेले
अभिषेक अरविंद सिंग याच्या ताब्यातून ५ महागड्या गाड्या जप्त करण्यात आल्या, ज्यांची एकूण किंमत ५९ लाख रुपये आहे. जप्त करण्यात आलेल्या गाड्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे:
1. महिंद्रा थार
2. टोयोटा फॉर्च्युनर
3. टोयोटा यारिस
4. होंडा अमेझ
5. होंडा सिटी
यातील २ गाड्यांचे नंबर बदललेले आढळले, त्यामुळे त्या चोरीच्या असल्याचा अधिक संशय बळावला आहे.
या संपूर्ण कारवाईत पोलीस उपआयुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने उत्कृष्ट कामगिरी बजावली.
या कारवाईत प्रभारी पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, उपनिरीक्षक नितीन बेद्रे, प्रशांत गांगुर्डे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमंत जेधे, मनोहर तावरे, आसीफ मुल्ला, विजय गायकवाड, रविंद्र भालेराव, गोविंद केंद्रे, प्रविणराज पवार, हनुमंत सुर्यवंशी, समीर यादव, विकास राजपूत, संदीप शेरमाळे, रविंद्र कांबळे, नितीन राठोड, संतोष चव्हाण आणि सचिन चौधरी यांचा सक्रिय सहभाग होता.