मिरा-भाईंदर जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मिरा भाईंदर महानगरपालिकेने स्त्री शक्ती, सामर्थ्याचे प्रदर्शन दाखविणारे ‘शक्ती संमेलन’ ११ मार्च २०२५ रोजी मिरा रोड येथील आप्पासाहेब धर्माधिकारी सभागृहात आयोजित करण्यात आले. या संमेलनात विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी स्त्री शक्ती, अधिक सशक्त करण्यासाठी त्यांचे आरोग्य आणि शिक्षण आदींवर भर दिला पाहिजे. स्त्री सक्षमीकरणासाठी मिरा भाईंदर महानगरपालिका कटीबद्ध आहे. महिलांचा विकास म्हणजे कुटुंबाचा, समाजाचा विकास, असे महिलांचा आशा आणि प्रेरणा देणारे संबोधन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाबिनोद शर्मा (भा.प्र.से) यांनी कार्यक्रमादरम्यान सर्व उपस्थित महिलांना उद्देशून केले.
मिरा भाईंदर महानगरपालिका वेळोवेळी महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवित असते. फराळी सखी सारख्या उपक्रमाला केंद्राच्या नीती आयोगाची मान्यता मिळालेली आहे. तसेच महापालिकेच्या पुढाकाराने शहरातील महिला बचत गटांनी राष्ट्रपती भवन येथील राष्ट्रीय प्रदर्शन, जयपूर येथील राष्ट्रीय प्रदर्शनात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले. याच स्त्री सामर्थ्याचे प्रदर्शन करणासाठी मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या महिला बालविकास विभागांतर्गत शक्ती संमेलनात महिला बचत गटांनी उप्तापदीत केलेल्या विविध साहित्य आणि वस्तूंचे भव्य प्रदर्शन आयोजन करण्यात आले.
या संमेलनात, राम बंधु मसाले कंपनीचे अध्यक्ष हेमंत राठी यांनी कर्मचाऱ्यांनी कामात कशी कार्यक्षमता आणावी तसेच कंपनी बनवताना आलेले अडथळ्यांवर कशी मात केली याबाबत प्रेरणादायी संवाद साधला. याचबरोबर, कायदे तज्ज्ञ रोहन खाड्ये यांनी महिला सुरक्षेसंदर्भातील कायद्यांवर माहितीपर चर्चासत्र घेतले. तर प्रसुती व स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. स्मिता भामरे यांनी महिलांच्या आरोग्याविषयक विविध समस्या आणि निराकरण यावर महत्त्वपूर्ण चर्चा केली. तसेच या यावेळी अर्थव्यवस्थापन, बचत आणि गुंतवणुकीबाबत अर्थ तज्ज्ञ संतोष साळुंके यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. एका सामान्य महिलेने, स्वत:ची कंपनी कशी उभी केली हे इलेक्ट्रोफाईंग रिसायकलच्या संस्थापिका वैशाली स्वरुप यांनी प्रोत्साहनपर भाषण दिले.
शक्ती संमेलनात, महानगरपालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी, मनपा शाळांच्या शिक्षिकांनी तसेच विद्यार्थ्यिंनींनी नाटुकले, गाणे आणि नृत्याविष्कार सादर केले. कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीत आणि गणेश वंदनेने करण्यात आली तसेच यात पारंपरिक लेझीम नृत्यही साकारण्यात आले.
या कार्यक्रमात,अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, अतिरिक्त आयुक्त सचिन बांगर, उपायुक्त (मुख्यलय) कल्पिता पिंपळे, शहर अभियंता दीपक खांबित, महिला बाल कल्याण विभाग अधिकारी चारुशीला खरपडे व इतर महिला अधिकारी वर्गाने उपस्थिती दर्शवली. यासह, महापालिकेच्या सर्व विभागांच्या महिला कर्मचारी, मनपा शाळांच्या शिक्षिका, आशा सेविका, बचत गटांच्या मिळून साधारण २ हजारहून अधिक महिला उपस्थित होत्या.