भाईंदर: मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी महापालिका आयुक्तपदी राधाबिनोद शर्मा या एमएमआरडीएतील सह आयुक्तपदी कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. व्ही. राधा, अप्पर मुख्य सचिव यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
नवी मुंबई सिडको येथे आयुक्तपदी कार्यरत असताना ९ ऑगस्ट २०२३ रोजी मीरा-भाईंदर महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेल्या संजय काटकर यांनी संध्याकाळी महापालिका आयुक्त पदाचा पदभार स्विकारला होता. आयुक्त प्रशिक्षणासाठी शहराबाहेर असतानाच अचानक बदलीचा आदेश जारी करण्यात आला असून महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार राधाबिनोद शर्मा या आयएएस अधिकाऱ्याकडे सोपविल्यानंतर आता नवनिर्वाचित आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्यासमोर शहरातील नवीन आवाहने तयारच आहेत.
भाईंदर याआधी एमएमआरडीएचे सह आयुक्त असलेले सनदी अधिकारी नव्या आयुक्तांसमोर नवी आव्हाने असणार आहेत. पालिकेची आर्थिक बाजू सांभाळणे तसेत ठेकेदारांची शेकडो कोटींची प्रलंबित देणी याबाबतचे निर्णय देखील महत्वाचे ठरणार आहेत. पालिकेने यापूर्वी विकास कामांसाठी घेतलेले एमएमआरडीए कर्ज, मुदत संपलेली व्यापारी कंत्राटे, अतिक्रमण निर्मूलन, इमारतीच्या रद्द केलेल्या परवानग्या, उपायुक्त यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांची रिक्त पदे, विधी विभागांचे अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत तसेच प्रामाणिक काम केलेल्यांना पदोन्नती असे अनेक प्रश्न नव्या आयुक्तांसमोर आहेत. राज्यातील ‘ड’ वर्ग मनपाचा विचार केला तर इतर मनपाच्या तुलनेत मिरा-भाईंदर मनपा श्रीमंत आहे, पण कर्जही मोठ्या प्रमाणात आहे. नवनियुक्त पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा २०१२ सालच्या बॅचचे अधिकारी आहेत आणि त्यांना बीड जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजी नगर येथे प्रशासक आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासह त्यांना एकूण मोठा अनुभव आहे. त्यांना प्रशासनातील कामाचा दांडगा अनुभव आहे. किमान आतातरी थेट सनदी अधिकारी आणि प्रशासक म्हणून कार्य केल्यास विकासाला चालना मिळेल, अशी आशा शहरातील नागरिकांना आहे. मुदत संपलेल्या अनेक कामांचे प्रश्न सोडविल्यानंतर त्यातून मिळणाऱ्या रकमेतून जागतिक बँकेची, एमएमआरडीएची एकरकमी कर्जफेड करावी लागणार आहे. कारण कर्जाच्या डोंगरामुळेच शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. त्यामुळे नव्या आयुक्तांसमोर आव्हानच आहे. शहरातील दैनंदिन साफसफाईचा प्रश्न, अतिक्रमण निर्मूलनाचा प्रश्न, पर्यावरणाचा हास, मनपातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची असलेली मोठ्या प्रमाणात रिक्त असलेली पदे अशा अनेक अडचणींवर मात करून अनेक प्रश्न नवे आयुक्त निकाली काढतील अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत.