दिल्लीतील पराभव स्पष्ट दिसत असल्यानेच विरोधकांचा फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांची टीका
मुंबई- काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवरून निवडणूक आयोगाविरोधात विधान केले. त्यांच्या या विधानाला भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधींसह विरोधक तिच तिच कॅसेट पुन्हा वाजवत आहेत. निवडणूक आयोगाने याआधीही आपली भुमिका स्पष्ट केली आहे. राहुल गांधींनी केलेल्या आरोपांना आयोग समर्पक असे उत्तर देईल. दिल्ली निवडणुकीत पराभव स्पष्ट दिसत असल्याने आतापासूनच फेक नरेटिव्ह पसरविण्याचा प्रयत्न विरोधकांचा सुरू आहे, अशी टीका दरेकरांनी केली.
आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर म्हणाले कि, महाराष्ट्रात मविआने तिच कॅसेट वाजवली. तिच कॅसेट नव्याने राहुल गांधी सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांना बाजूला बसवून वाजवताहेत. यावरून राजकारणातील पोरकटपणा दिसून येतोय. राहुल गांधींना सुर सापडत नाही. पक्षाची वाताहत होतेय त्याकडे लक्ष देऊन पुन्हा उभं राहायची हिम्मत गळाली असूनही तिच तिच कॅसेट पुन्हा वाजविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. लोकांना तुमच्या नौटंकीची सवय झालीय. विरोधकांना दिल्लीतील पराभव स्पष्ट दिसतोय. पराभवाची मानसिकता आताच करून त्याचे विश्लेषण करण्यासाठीचा, फेक नरेटिव्ह पसरविण्याचा हा प्रयत्न आहे. परंतु दिल्लीची जनता भाजपाला बहुमत देईल आणि तेथील विकासासाठी पुन्हा एकदा दालन खुले होईल, असेही दरेकर म्हणके.
ठाकरे गटाच्या खासदारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर आ. दरेकर म्हणाले कि, एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळी उठाव केला त्यावेळेस उद्धव ठाकरेंसोबत वर्षावर उदय सामंत, गुलाबराव पाटील हे सारे नेते होते. बरेचसे नेते बैठक घेऊन शिंदेंसोबत गेले. त्यामुळे आपल्या पत्रकार परिषदेत आले म्हणजे जाणार नाही यावर त्यांचा विश्वास असेल तर आनंद आहे. परंतु उबाठा गटात बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देण्यात आलीय. बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्या काँग्रेसवर टीका-टिप्पणी केली त्या काँग्रेससोबत बसणे सच्चा शिवसैनिकाला अस्वस्थ करतेय. उद्धव ठाकरे उबाठा शिवसेना किती पुढे नेतील याबाबत ते साशंक आहेत. खासदारांना त्यांच्या मतदार संघात केंद्र व राज्याच्या माध्यमातून विकास करण्यासाठी सरकारची मदत गरजेची आहे. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अर्थाने हे खासदार शिंदे यांच्यासोबत जाऊ शकतात किंवा वेगळा पर्याय स्वीकारु शकतात, असेही दरेकरांनी म्हटले.
अरविंद सावंत यांच्या वक्तव्यावर दरेकर म्हणाले कि, आपल्याला ठेच लागल्यावरही उबाठा दुरुस्त होत नाही. शिंदे यांना गृहीत धरत गेले आणि ते संपूर्ण शिवसेना सोबत घेऊन गेले, त्याचा थांगपत्ताही लागला नाही. तशाच प्रकारची स्थिती आता असून ते मान्य करायला तयार नाहीत. बीड आणि या प्रकरणाचा संबंध काय? त्यामुळे ते संभ्रमित झालेत. त्यातून त्यांना नेमकं काय करावे हे संजय राऊत यांच्यासह उबाठा नेत्यांना सुचताना दिसत नाही.