लोकसभेत संविधानाच्या मुद्द्यावरील चर्चेचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशीच्या संविधानावरील चर्चेला सुरूवात करताना संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले. त्यांच्या भाषणादरम्यान त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जवाहरलाल नेहरू यांच्यातील मतभेदांवर देखील वक्तव्य केले.किरेन ऱिजिजू यांनी देशातील अल्पसंख्य सुरक्षित नाहीत म्हणणे चुकीचे असल्याचा दावा केला. ते म्हणाले की देशात अल्पसंख्यांक सुरक्षित आहेत म्हणूनच शेजारील देशात काही संकट आल्यास लोक पहिल्यांदा भारतात येतात. या भाषणावेळी त्यांनी काँग्रेसवर देशातील सीमा भागातील नागरिकांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला.
अल्पसंख्याक सुरक्षित नाही म्हणणे चूक
देशातील अल्पसंख्यांक समुदायाच्या सुरक्षिततेसंबंधी बोलताना रिजिजू म्हणाले की, “देशात अशा गोष्टी बोलल्या जातात जसे की देशात अल्पसंख्यांकांना कीही अधिकारच नाहीत. सेंटर फॉर पॉलिसी अॅनालिसीस इन युरोपियन यूनियन या सर्व्हेनुसार, युरोपियन यूनियनमध्ये ४८ टक्के लोकांना भेदभावाचे लक्ष्य ठरले, ज्यामध्ये जास्त लोक मुस्लिम धर्माला मानणारे होते. फ्रान्समध्ये बुरखा घालणार्या बहुतांश मुस्लिम लोकांवर आक्षेप घेण्यात आले. स्पेनमध्ये मुस्लिमांविरोधात हेट क्राइमचा दर खूप जास्त आहे. इंडोनेशिया या मुस्लिम बहुल देशात शिया आणि अहमदिया यांच्याविरोधात भेदभाव होत आहे. पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणीस्तानमध्ये काय होतं ते आपल्याला माहिती आहे. तीबेट, म्यानमार, श्रीलंका, बांग्लादेश, पाकिस्तान कुठेही अल्पसंख्यांवर अन्याय होतो तेव्हा सगळे पहिल्यांदा भारतात येतात. इथे सुरक्षा मिळते म्हणूनच इथे येतात. मग इथे अल्पसंख्यांकावर अन्याय होतो असे का म्हटले जाते?” “घटना कुठेतरी होत असतील. पण घरोघरी कुटुंबात भांडणं होत असतात. भारतात अल्पसंख्यांकांना गुरुद्वारामध्ये, मुस्लिमांना दर्ग्यात जाऊ दिले जात नाही असे का म्हटले जाते? अशा गोष्टी बोलल्या जाऊ नयेत ज्यामुळे देशाची प्रतिमा खराब होईल”, असेही किरेन रिजिजू म्हणाले.पुढे बोलताना रिजिजू यांनी काँग्रेसवर देशाच्या सीमावर्ती भागातील पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत जोरदार हल्ला चढवला. रिजिजू म्हणाले की, मी खासदार बनत नाही तोपर्यंत आसाम सोडून बहुतांश सीमा भागात गाडीने जाण्याची सोय नव्हती, कारण रस्ते बांधण्यात आले नव्हते. रिजिजु म्हणाले की, माजी संरक्षण मंत्र्यांनी स्वत: राज्यसभेत सांगितले होते की, मी देशाचा संरक्षणंत्री आहे आणि मला हे सांगण्यास संकोच वाटत नाही की आमचे म्हणजेच काँग्रेस सरकारने सीमा भागात रस्ते बनवू नयेत असे धोरण ठरवले आहे. रस्ता केला तर चीन येईल आणि आपली जमीन ताब्यात घेईल. १९६२ च्या भारत-चीन युद्धाचा उल्लेख करत सांगितलं की, मी ज्या गावात राहतो ते माझं गावं १९६२ साली दोन दिवसांसाठी चीनच्या ताब्यात होतं. आमचं गाव आणि परिसराचा ताबा चीनच्या सैन्याने घेतला होता. आम्हाला चीनच्या नावाने घाबरवलं जात असे. जेवण करत नसलेल्या मुलांना लवकर जेवण कर नाहीतर चीनी लोक येतील अशी भीती घातली जात असे. मी जेव्हा मोठा झालो तेव्हा मी विचार केला की तेव्हा जे सरकार होते ते आमच्यासाठी रस्ता बनवत नाही, आमच्याबद्दल विचार करत नाही. मग जेव्हा मी राजकीय पक्षात सहभागी होण्याचा विचार केला तेव्हा पहिल्यांदा मी राष्ट्रवादी विचार असलेल्या आणि भारताच्या प्रत्येक इंच जमिनीचे रक्षण करण्याची हिम्मत असलेल्या पक्षात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.लोकसभेत भारतीय संविधानाला ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमीत्त होत असलेल्या चर्चेदरम्यान बोलताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दलित आणि आरक्षणाबद्दलच्या विचारांवर प्रश्न उपस्थित केले. रिजिजू म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की पंडित नेहरू मागील २० वर्षांमध्ये २००० भाषणे दिली आहेत मात्र एकाही भाषणात अनुसूचित जातींच्या कल्याणाबद्दल बोलले नाहीत.