“माझा मुलगा डावखुरा फलंदाज, तोही माझ्यासारखाच…”, विनोद कांबळी आजारपणात कुटुंबाबाबत काय म्हणाले?

Spread the love

दिवंगत क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी पार्क येथे आचरेकर यांच्या स्मारकाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी त्यांचे एकेकाळचे शिष्य असलेले सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी उपस्थित होते. यावेळी मंचावर बसलेल्या विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर यांच्या भेटीचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. ज्यामध्ये विनोद कांबळीला उठता येत नव्हते, व्यवस्थित बोलता येत नव्हते, असे दिसले. या व्हिडीओनंतर विनोद कांबळीबाबत पुन्हा एकदा उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. मात्र आता विकी ललवानी यांना दिलेल्या एका मुलाखतीत विनोद कांबळीने आपले आजारपण, कौटुंबिक आणि सध्याची आर्थिक परिस्थिती याबाबत भाष्य केले आहे. तसेच आपला मुलगाही क्रिकेट खेळत असल्याची माहिती दिली. या मुलाखतीमध्ये कुटुंबाबाबत बोलत असताना विनोद कांबळी म्हणाले, मला १४ वर्षांचा एक मुलगा आणि १० वर्षांची एक मुलगी आहे. मुलगा जिजस क्रिस्टियानो कांबळीही क्रिकेट खेळतो. तोही माझ्यासारखाच डावखुरा फलंदाज असून बिनधास्त फटकेबाजी करतो. पहिल्या चेंडूपासून तो फटकेबाजी करत असून तो माझ्यासारखाच खेळतो. तोही कधीतरी भारतीय संघात येईल, असे मला वाटते.
गाडी चालविताना हृदयविकाराचा झटका आला आणि..
विनोद कांबळी ह्रदयविकाराचा झटका आला त्या घटनेबद्दल सांगताना म्हणाले, “मला अचानक अस्वस्थ वाटायला लागले होते. मी कार चालवता चालवताना पडलो आणि माझ्या पत्नीने मला थेट लिलावतीमध्ये दाखल केले आणि तेव्हा दोन हृदयविकाराचे झटके आले होते. एकावेळी दोन हृदयविकाराचे झटके कोणाला येतात. माझी पत्नी तेव्हा माझ्याबरोबर होती, ते सर्व पाहून रडत होती.” विनोद कांबळी यांनी आपल्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीबाबतही भाष्य केले. ते म्हणाले, “माझी आर्थिक परिस्थिती सध्या हलाखीची आहे. पण माझे कुटुंब खंबीरपणे माझ्या पाठिशी उभे आहे. माझी पत्नी अँड्रियाने सर्व व्यवस्थित हाताळले असून मी तिला सलाम करतो.” तसेच सुनील गावस्कर, कपिल देव यांनी मला मदतीचे आवाहन केले आहे. कपिल देव यांनी मला पुनर्वसन केंद्रात जाण्याचे आवाहन केले आहे, तेही मी स्वीकारले असल्याचे ते म्हणाले.
वानखेडेवरील खेळी स्मरणात राहिली
विनोद कांबळी यांनी दोनवेला द्विशतक झळकावले होते. यातील कोणती खेळी स्मरणार राहिली? असा प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले, वानखेडेवर झालेल्या सामन्यात झळकावलेले द्विशतक कायम लक्षात राहिले. त्या सामन्यात आचरेकर सरही मैदानावर उपस्थित होते. त्यावेळी संघात सर्व उत्कृष्ट खेळाडू होते. तो सामना माझ्या कायम लक्षात राहिर, असे विनोद कांबळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *