ॲडलेड कसोटीत ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील सामन्यादरम्यान वादावादी पाहायला मिळाली. गुलाबी चेंडूच्या या कसोटीत सिराज खूपच आक्रमकपणे खेळत होता. मार्नस लबुशेननंतर त्याचा ट्रॅव्हिस हेडशीही वाद झाला. यानंतर ऑस्ट्रेलियन चाहत्यांची त्याची मैदानात हुर्याे उडवली होती. माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि मीडिया देखील त्याच्यावर टीका करताना दिसले. आता सिराज-हेडच्या वादाचे प्रकरण आयसीसीपर्यंत पोहोचले असून ते दोन्ही खेळाडूंवर कारवाई करणार असल्याची बातमी समोर येत आहे.द टेलिग्राफच्या वृत्तानुसार, आयसीसीने आता या प्रकरणाची दखल घेतली असून दोन्ही खेळाडूंना शिस्तभंगाच्या सुनावणीसाठी बोलावले आहे. यावेळी आयसीसी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेणार आहे. मात्र, दोन्ही खेळाडूंना कोणत्याही प्रकारच्या निलंबनाचा सामना करावा लागणार नसल्याचेही या वृत्तामध्ये म्हटले आहे. रिपोर्टनुसार, कॅमेऱ्यात कैद झालेल्या फुटेजसाठी आयसीसीच्या आचारसंहितेत फार मोठी शिक्षा नाही. ॲडलेडमध्ये गुलाबी चेंडू कसोटीच्या दुसऱ्या दिवशी सिराज आणि हेड यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.
हेड शतक झळकावून भारताविरूद्ध १४० धावा करत खेळत होता, त्यानंतर सिराजने त्याला यॉर्करवर क्लीन बोल्ड केले आणि पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर दोघेही एकमेकांना भिडताना दिसले. हेड आऊट झाल्यावर काहीतरी बोलला, त्यावर सिराजने प्रतिक्रिया दिली आणि ड्रेसिंग रूमकडे बोट दाखवत त्याला जाण्यासाठी सांगितले. सिराज आक्रमकपणे सेलिब्रेशन करतानाही दिसला. ॲडलेड हे हेडचे होम ग्राउंड आहे. या मैदानावर त्याच्याबरोबरचं असं वागण पाहून ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी बाऊंड्री लाईनवर सिराजला चिडवायला सुरुवात केली.दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर हेडने पत्रकार परिषदेत सिराजच्या चांगल्या गोलंदाजीचे कौतुक केल्याचा दावा केला होता. पण बदल्यात मला मिळालेली वागणूक चुकीची होती, मी निराश झालो आहे, असे तो म्हणाला. सिराजने त्याच्या वक्तव्याचे लगेच खंडन केले. हेडने आधी शिवीगाळ केल्याचा दावा त्याने केला. मात्र, खेळाच्या तिसऱ्या दिवशी दोन्ही खेळाडू हे प्रकरण मिटवताना दिसले. सिराजने फलंदाजी करताना हेडशी बोलून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर हा वाद संपल्याचे मानले जात आहे.