मुंबई : दिल्लीतील ‘सेेंट्रल विस्टा’च्या धर्तीवर विधानभवन परिसराचा पुढील दोन वर्षांत कायापालट करण्याचा संकल्प विधानसभेचे नवे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केला. यानुसार नवीन इमारतीची उभारणी, नागपूरमध्ये मध्यवर्ती सभागृह, कामकाज कागदविरहित करण्याची योजना त्यांनी मांडली आहे.मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर विधानसभेच्या सदस्यांची संख्या २८८ वरून ३५० वर जाण्याची शक्यता आहे. सध्याच्या सभागृहात ३०३ सदस्य बसू शकतात एवढी क्षमता आहे. यामुळे नव्या सभागृहाची आवश्यकता भासणार आहे. विधानभवनाच्या सध्याच्या इमारतीच्या समोरील मोकळ्या जागेत नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. विधानभवनाच्या आसपासची सर्व जागा महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खात्यांकडून विधिमंडळ सचिवालयाकडे हस्तांतरित झाली आहे. या जागेवर नवीन इमारत बांधण्याची योजना आहे. यासाठी वाहनतळाच्या जागेचाही उपयोग केला जाईल, असे नार्वेकर यांनी सांगितले.
नार्वेकर म्हणाले…
● भविष्यात मंत्रालय आणि विधान भवन परस्परांना भुयारी मार्गाने जोडता येऊ शकेल.
● नागपूरमध्ये नवीन मध्यवर्ती सभागृह लवकरच बांधण्यात येणार आहे. यातून नागपूरमध्ये राज्यपालांचे अभिभाषण आयोजित केले जाऊ शकते.
● विधिमंडळाचे कामकाज पुढील दोन वर्षांत कागदविरहित करण्यात येणार आहे.
● अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारे महाराष्ट्र विधिमंडळ हे देशातील पहिले विधिमंडळ आहे.
● सध्या आमदारांच्या निवासाची व्यवस्था करता येत नाही. आमदारांच्या निवासस्थानासाठी ‘मनोरा’ आमदार निवास पुढील दोन वर्षांत बांधून पूर्ण होईल.