भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील पिंक बॉल कसोटी सामन्यातील पहिले सत्र झाले असून ब्रेक झाला आहे. पहिल्या सत्रात भारताने ८३ धावा करत ४ विकेट्स गमावले आहेत. सध्या मैदानावर ऋषभ पंत आणि रोहित शर्माची जोडी खेळत आहे. रोहित शर्मा या सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी उतरला आहे. यशस्वी जैस्वाल आणि राहुलची जोडी सलामीसाठी उतरली होती. पण भारताला सामन्यातील पहिल्याच चेंडूवर मोठा धक्का बसला. जैस्वालला स्टार्कने पहिल्याच चेंडूवर बाद करत बदला घेतला.
भारताकडून यशस्वी जैस्वाल स्ट्राईकवर होता तर ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने गोलंदाजीला सुरूवात केली. स्टार्कने पहिल्याच चेंडूवर यशस्वी जैस्वालला गोल्डन डकवर बाद केलं. आऊटस्विंग चेंडूवर स्टार्कने जैस्वालला पायचीत करत मोठा बदला घेतला. यासह स्टार्कने गेल्या सामन्यात जैस्वालने स्लेजिंग केल्याचा बदला घेतला आहे. पर्थमध्ये यशस्वीने स्लेजिंग करताना स्टार्कच्या गोलंदाजीवर चांगली फटकेबाजी केली होती.यशस्वीने स्टार्कच्या पहिल्याच चेंडूवर रेषेच्या बाहेर फ्लिक करण्याचा प्रयत्न केला, पण चेंडूच्या हालचालीमुळे चेंडू थेट जैस्वालच्या पॅडवर लागला आणि पंचांनी त्याला लगेच बाद घोषित केले. आऊट झाल्यामुळे निराश झालेल्या यशस्वीने केएल राहुलशी चर्चा केली, परंतु पंचांच्या निर्णयावर रिव्ह्यू न घेण्याचा निर्णय घेतला आणि तो पॅव्हेलियनमध्ये परतला. पर्थमधील पहिल्या कसोटीत भारताच्या विजयात यशस्वीने महत्त्वाची भूमिका बजावली होती, जिथे पहिल्या डावात शून्यावर बाद झाल्यानंतर दुसऱ्या डावात त्याने शानदार १६१ धावा केल्या.पहिल्या सामन्यादरम्यान जैस्वालने स्टार्कला स्लेज केले होते, जैस्वाल पर्थ कसोटीच्या दुसऱ्या डावात तुफान फटकेबाजी करत होता तेव्हा जैस्वालने त्याला स्लो बॉलिंग करत असल्याचे म्हणत स्लेज केले. सामन्यानंतर याबद्दल बोलताना स्टार्क म्हणाला की, मी जैस्वाल नेमका काय म्हणाला हे मी ऐकलं नाही. तेव्हाही मैदानात स्टार्कने त्याला काही उत्तर दिले नव्हते. पण जैस्वालला आता पहिल्याच चेंडूवर बाद केल्याने त्याने बदला घेतल्याचे चाहते म्हणत आहे.