बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धेतील दुसरा कसोटी सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ६ डिसेंबरपासून ॲडलेड ओव्हलवर खेळवला जाणार आहे. गुलाबी चेंडूने खेळल्या जाणाऱ्या या कसोटी सामन्यात यजमान संघाच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. पहिल्या कसोटीत २९५ धावांनी बालेकिल्ल्यात झालेल्या पराभवानंतर दुसरा कसोटी सामना ऑस्ट्रेलिया संघासाठी महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघ ॲडलेड कसोटी जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. पर्थ कसोटी सामन्यातील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने ॲडलेड कसोटी सामन्यासाठी आपली प्लेईंग- ११ जाहीर केली आहे.
पॅट कमिन्सने संघात केला मोठा बदल
पर्थ कसोटी सामना संपल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा सर्वात महत्त्वाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे ॲडलेड कसोटीपूर्वी बाहेर पडला. आता त्याच्या जागी दुसऱ्या कसोटीच्या एक दिवस आधी यजमान संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने पत्रकार परिषदेत स्कॉट बोलँडचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केल्याचे जाहीर केले आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियन संघात कोणताही बदल झालेला नाही. स्कॉट बोलँडने २०२३ मध्ये झालेल्या अॅशेस मालिकेदरम्यान शेवटचा कसोटी सामना खेळला होता, त्यानंतर आता तब्बल ५१९ दिवसांनंतर, तो पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन कसोटी संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील झाला आहे.स्कॉट बोलँडने आत्तापर्यंत आपल्या कारकिर्दीत फक्त १० कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी २ सामने त्याने भारतीय संघाविरुद्ध खेळाले आहेत. यादरम्यान बोलँडने २७.८० च्या सरासरीने ५ विकेट्स घेतल्या आहेत. भारताविरुद्ध मायदेशात कसोटी सामना खेळण्यासाठी बोलँड पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. बोलँडने आतापर्यंत १० सामन्यांमध्ये २०.३४ च्या सरासरीने ३५ विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामध्ये तो एकदाच एका डावात ५ विकेट घेण्यात यशस्वी ठरला आहे.
भारताविरुद्ध पिंक बॉल कसोटीसाठी ऑस्ट्रेलयाची प्लेईंग इलेव्हन
उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, स्कॉट बोलँड.