एकेकाळी कर्णधार एमएस धोनीचे मैदानावरील सर्वात मोठे हत्यार हरभजन सिंग होते. ऑफस्पिनर हरभजनने टीम इंडियाला अनेक सामने जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हरभजन सिंग बराच काळ धोनीच्या नेतृत्वाखाली खेळला आहे. भज्जी आणि धोनी २००७ टी-२० वर्ल्ड कप आणि २०११ वनडे वर्ल्ड कपमध्ये एकत्र खेळले होते. त्यानंतर दोन्ही खेळाडू चेन्नई सुपर किंग्जमध्ये एकत्र खेळले. मात्र, आता भज्जीने मोठा खुलासा केला आहे. हरभजनने सांगितले की, गेल्या १० वर्षांपासून तो एमएस धोनीशी बोलला नाही. असं धोनी का म्हणाला? जाणून घेऊया. मात्र, एक मात्र नक्की की २०११ च्या विश्वचषकानंतर सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, झहीर खान, गौतम गंभीर, हरभजन सिंग आणि युवराज सिंग यांना फारशी संधी मिळाली नाही. २०१५ पर्यंत अनेक क्रिकेटपटूंनी निवृत्ती घेतली होती. त्यानंतर भज्जी आणि युवराज राहिले होते, पण त्यांना संधी मिळाली नाही. दोघेही पंजाबसाठी एकत्र खेळले आहेत आणि दोघांनाही धोनीच्या नेतृत्त्वाखाली संघात चांगली वागणूक दिली जात नसल्याची चर्चा अनेकदा झाली आहे. आता भज्जीने एमएस धोनीसोबतच्या संभाषणावर मोठे वक्तव्य केले आहे. न्यूज 18 शी बोलताना हरभजन सिंग म्हणाला, “मी धोनीशी बोलत नाही. मी जेव्हा सीएसकेसाठी खेळायचो तेव्हा आम्ही बोलायचो, पण त्याशिवाय आम्ही कधीच बोललो नाही. या गोष्टीला १० वर्षे झाली आहेत. मला माहित नाही की या मागे काय कारण आहे. आम्ही जेव्हा आयपीएलमध्ये सीएसकेसाठी खेळत होतो, तेव्हा आम्ही बोलायचो. तेही केवळ मैदानापुरते मर्यादित होते. मैदानाव्यतिरिक्त तो माझ्या खोलीत आला नाही आणि मी पण त्याच्या खोलीत कधी गेलो नाही.”
कधीही फोन करण्याचा प्रयत्न केला नाही –
भज्जीने पुढे सांगितले की, सध्या तो युवराज सिंग आणि आशिष नेहरा यांच्याशी नियमित बोलतो. हरभजन पुढे म्हणाला की, “माझ्या मनात त्याच्याविरुद्ध काही नाही. त्याला काही बोलायचे असेल तर तो मला बोलू शकतो, पण त्याला काही बोलायचे असते, तर तो मला आतापर्यंत बोलला असता. मी त्याला कधीही फोन करण्याचा प्रयत्न केला नाही. कारण मी खूप जिद्दी आहे.” हरभजन सिंग पुढे म्हणाला, “मी फक्त त्यांनाच कॉल करतो, जे माझे फोन उचलतात.माझ्याकडे इतर कशासाठीही वेळ नाही. जे लोक माझे मित्र आहेत त्यांच्याशी मी संपर्कात राहतो. नातं हे नेहमी घेण्यासाठी आणि देण्यासाठीच असतं. जर मी तुमचा आदर करतो, तर तुम्हीही माझा आदर कराल अशी माझी अपेक्षा आहे. किंवा तुम्ही मला प्रतिसाद द्याल, पण जर मी तुम्हाला एक-दोनदा फोन केला आणि उत्तर मिळाले नाही, तर कदाचित मला गरजेच वाटत तितकेच मी तुम्हाला भेटेन.”