“बॉलीवूडमध्ये गटबाजी, १५ महिने काम नव्हतं”, २००९ मध्ये काय घडलेलं? विवेक ओबेरॉयने सांगितली इंडस्ट्रीची वस्तुस्थिती

Spread the love

विवेक ओबेरॉयने २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कंपनी’ चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. यानंतर आलेल्या ‘साथिया’ चित्रपटात विवेक प्रेक्षकांना एका रोमँटिक हिरोच्या भूमिकेत पाहायला मिळाला. पण, बॉलीवूडच्या झगमगत्या दुनियेत अनेकदा कलाकारांना कठीण प्रसंगाचा सामना करावा लागतो. प्रचंड मेहनत घेऊनही विवेकला अनेक वर्षं फिल्म इंडस्ट्रीपासून दूर राहावं लागलं. यानंतर अभिनेत्याने मनोरंजन विश्वापासून पूर्णपणे ब्रेक घेत आपलं नशीब एका नव्या क्षेत्रात आजमावलं. उत्तम अभिनयाबरोबच आजच्या घडीला विवेक ओबेरॉय आघाडीचा व्यावसायिक म्हणून ओळखला जातो.विवेकने नुकतीच ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या ‘स्क्रीन’ला मुलाखत दिली, यावेळी त्याने त्याच्या ‘चॉकलेट बॉय’ इरापासून, पुढे बॉलीवूडमधला संघर्ष ते यशस्वी व्यावसायिक असा सगळा प्रवास उलगडून सांगितला आहे. विवेक म्हणाला, “मी माझ्या करिअरच्या गेल्या २२ वर्षांमध्ये जवळपास ६७ प्रोजेक्ट्समध्ये काम केलंय. पण, या इंडस्ट्रीबाबत तुम्ही कोणत्याही प्रकारची शाश्वती देऊ शकत नाही. तुम्ही उत्तम काम करता, पुरस्कार जिंकता, आपलं काम व्यवस्थित मन लावून करता, एक अभिनेता म्हणून तुम्ही सगळ्या गोष्टी करता पण, इतकं सगळं करूनही तुम्हाला काही क्षुल्लक आणि वेगळ्याच कारणांनी काम दिलं जात नाही. २००७ मध्ये मी ‘शूटआउट अ‍ॅट लोखंडवाला’ या सिनेमात काम केलं होतं आणि त्यातलं ‘गणपत…’ हे गाणं प्रचंड व्हायरल झालं. मला पुरस्कार देखील मिळाले. मला वाटलं त्यानंतर मला बरंच काम मिळेल. पण, माझा अपेक्षाभंग झाला मला कोणतंही काम मिळालं नाही. चित्रपटाला एवढं यश मिळूनही मी १४ ते १५ महिने फक्त घरी बसून होतो. २००९ मध्ये मी मनाशी ठामपणे ठरवलं, आपल्याला पूर्णपणे या इंडस्ट्रीवर अवलंबून राहता येणार नाही, आपण पर्यायी मार्गाचा विचार केला पाहिजे. आर्थिक गरजेसाठी मी स्वत:चं काहीतरी करण्याचा विचार केला. जिथे एखादी लॉबी (गटबाजी) तुमचं करिअर ठरवेल, अशा भानगडीत मला पडायचं नव्हतं. काहीजण विशिष्ट गोष्टी करण्यासाठी तुम्हाला धमकावतात, कंट्रोल करतात यापासून वेगळं मला स्वत:चं काहीतरी हवं होतं.” “सिनेमा माझं पॅशन आहे पण, बिझनेस करणं हा माझा नेहमीच प्लॅन ‘बी’ होता. लहानपणापासूनच मला बिझनेस, आर्थिक गुंतवणूक याची बरीच माहिती होती. त्यामुळे मी बिझनेसचा मार्ग निवडला आणि या गटबाजीपासून दूर गेलो. एखादा माणूस तुम्हाला असा वर-वर दिसताना खूप यशस्वी वाटू शकतो. पण, तो आतून एकाकी असतो. जर आज तुम्ही उत्तम निर्णय घेतले, तर तुमचं उद्याचं आयुष्य सुकर होईल. आपण काहीच न करता देवाला आणि नशीबाला दोष देतो असं करू नये. आता मी माझ्यासाठी जगतोय. मी आधी प्रत्येक गोष्टीचा बराच विचार करायचो पण, आता मी फार दडपण घेत नाही. मेहनत केल्यावर आयुष्य नेहमीच तुम्हाला योग्य दिशा दाखवतं.” असं विवेक ओबेरॉयने सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *