‘…तोपर्यंत एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळायला हवं होतं’, शिवसेनेच्या नेत्याचं मोठं विधान

Spread the love

विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. महायुतीला मिळालेल्या यशानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापनेसाठी नेत्यांच्या हालचाली सुरु आहेत. खरं तर विधानसभेचा निकाल लागून आठवडा होऊन गेला तरीही अद्याप सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. सरकार स्थापनेसाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठकांवर बैठका सुरु आहेत. एवढंच नाही तर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची दिल्लीत अमित शाह यांच्याबरोबर देखील बैठक पार पडली. मात्र, त्यानंतरही मंत्रि‍पदाचा तिढा सुटला नसल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे हे गृहमंत्री पदासाठी आग्रही असल्याचं बोललं जात आहे. मात्र, ते पद सोडण्यासं भाजपा तयार नसल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, या सर्व घडामोडींबाबत राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. आता शिंदेंच्या शिवसेनेते नेते गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया देत सूचक भाष्य केलं आहे. ‘स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदेंना मिळायला हवं होतं, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान, गुलाबराव पाटील यांच्या या विधानामुळे अद्यापही शिवसेना (शिंदे) मुख्यमंत्री पदासाठी आग्रही असल्याची चर्चा रंगली आहे.“शिवसेनेच्या आमदारांमध्ये आणि महाराष्ट्रातील जनतेमध्ये जो एक राजकीय प्रवास चालला होता. त्यामुळे लोकांना अपेक्षा होती की, राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा एकनाथ शिंदे व्हावेत. मात्र, त्यांनी शेवटी सांगितलं की माझी कुठलीही अडचण राहणार नाही. तसेच आमची देखील अशी इच्छा आहे की, एकनाथ शिंदे यांनी राज्याचं उपमुख्यमंत्री पद घेत असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होईपर्यंत मुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदेंना मिळालं असतं तर फार चांगलं झालं असतं. मात्र, एकनाथ शिंदेंनीच त्या गोष्टीचा विचार सोडल्यामुळे त्यांना उपमुख्यमंत्री पद देत असताना त्यांना गृहमंत्री पद मिळावं, अशी आमच्या सर्व आमदारांची इच्छा आहे. तसेच त्यांनी सत्तेत राहावं, अशीही आमची इच्छा आहे”, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
गृहखातं सोडण्यास भाजपा का तयार नाही?
महायुतीच्या सरकारमध्ये गृहखातं मिळण्यासाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत. मात्र, भाजपाचा याला विरोध असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात गुलाबराव पाटील यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, “भाजपाच्या नेत्यांचं म्हणणं काय आहे? या पेक्षा केंद्रीय नेत्यांकडे आपण गृहखातं मिळण्यासंदर्भात मागणी केलेली आहे. त्यावर केंद्रीय नेतृत्व जो काही निर्णय घेतील तो निर्णय मान्य असेल, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे हा निर्णय राज्यातील नेत्यांवर अवलंबून नाही”, असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं. “आम्ही मुख्यमंत्रिपद मिळावं अशी आधीपासून मागणी केली होती. पण आमच्या नेतृत्वाने सांगितलं की आमची काही अडचण राहणार नाही. आम्ही एकनाथ शिंदे यांचा आदेश पाळणारे कार्यकर्ते आहोत. सर्वांची इच्छा आहे होती की एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं. पण नेता जे सांगत असेल ते कार्यकर्त्यांनी ऐकलं पाहिजे. शेवटी तीन पक्षांचं सरकार आहे, त्यामुळे तिन्ही पक्षांचा समतोल राहण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी तो निर्णय घेतला आता त्या निर्णयाच्या पाठीशी आम्ही आहोत”, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *