सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या पक्ष प्रतोद पदी राज्यातील सर्वात तरूण आमदार रोहित पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे. विधीमंडळात पक्षाचे संख्याबळ इतिहासात पहिल्यांदाच इतके कमी झाल्यानंतर एका तरूण नेतृत्वावर ही जबाबदारी आल्याने त्यांची राजकीय प्रवेशावेळीच कसोटी लागणार आहे. विधीमंडळात सामान्यांचे प्रश्न कसे मांडतात, शासनाकडून लोकांना अपेक्षित निर्णय कसे पदरी पाडून घेतात हे पाहणे औत्सुक्याचे तर ठरणार आहेच, पण माजी उपमुख्यमंत्री स्व. आरआर आबांचा वारसदार म्हणून त्यांच्याकडून जनतेच्याही खूप अपेक्षा आहेत. राजकीय जीवनातील पहिल्याच पायरीला त्यांना या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे.विधानसभा निवडणुकीत माजी खासदार संजयकाका पाटील यांचे आव्हान त्यांनी जनतेच्या पाठिंब्यावर परतून लावले. तासगावमध्ये काका-आबा हे दोन गट गेल्या तीन दशकापासून राजकीय क्षेत्रात आहेत. आबांनाही प्रत्येक निवडणुकीत चुरशीने लढत द्यावी लागली होती. मात्र, पंधरा वर्षापुर्वी जेष्ठ नेते शरद पवार यांनी हा वाद संपुष्टात आणून काकांना विधान परिषदेवर संधीही दिली होती. यानंतर बदलत्या राजकीय वातावरणात काकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सलग दोन निवडणुकीमध्ये त्यांना लोकसभेवर काम करण्याची संधी सांगलीकरांनी दिली. तथापि, सहा महिन्यापुर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. तासगाव-कवठेमहांकाळ या त्यांच्या घरच्या मतदार संघात त्यांना ९४११ मते कमी मिळाली. मात्र, या पराभवानंतरही त्यांनी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून लढवली. आणि या निवडणुकीतही मतदारांनी त्यांना पराभूत केले. रोहित पाटील या तरूणांने त्यांना पराभूत केले. यात आबांच्या कर्तृत्वाचा जसा वारसा आहे तसाच काकांच्या अतिआत्मविश्वासाचाही वाटा आहे. आबांच्या पश्चात सुमनताई पाटील यांनी या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार यांच्या गटात न जाता आबांच्या गटाने शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला. या घराण्याचे राजकीय निर्णय घेण्याची तयारी रोहित पाटील यांची अगोदरपासूनच आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाचा युवा नेता म्हणून त्यांनी राज्यभर प्रचाराची धुरा सांभाळली होती. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची आता विधीमंडळात बाजू मांडण्याची जबाबदारी आमदार पाटील यांच्यावर आली आहे. जाहीर सभेत बोलणे वेगळे आणि सभागृहात बोलणे वेगळे याची खबरदारी त्यांना घ्यावी लागणार आहे. भाजप-सेना युती शासनाच्या काळात स्व. आबांनी विविध प्रश्न उपस्थित करून लक्ष्यवेधीकार हा किताब पटकावला होता. याची माहिती करून घ्यावी लागणार आहे. विधीमंडळात मिळत असलेली संविधानिक आयुधे वापरून आपला वेगळा ठसा त्यांना तयार करावा लागणार आहे. त्यात ते कितपत यशस्वी होतात हे येणारा काळच सांगणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची दोन महत्वाची पदे आता सांगली जिल्ह्याच्या वाट्याला आली आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जेष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांच्याकडे आहे, तर पक्षाचे मुख्य प्रतोद पद आ. रोहित पाटील यांच्याकडे आहे. महायुती संख्याबळाने विधीमंडळात मोठी आहे. या संख्याबळाच्या जोरावर नको ती भूमिका सरकारकडून पुढे रेटण्याचा प्रयत्न होउ शकतो याचा प्रतिकार करण्याची जबाबदारी आता तासगावच्या तरूण नेतृत्वावर सोपविण्यात आली आहे. पुढील वर्षी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका यांच्या निवडणुकीवेळी पक्ष प्रतोद म्हणून पक्षाची जबाबदारी स्वीकारत असताना मतदार संघातही आपली ताकद दाखवावी लागणार आहे. ही दुहेरी जबाबदारी रोहित पाटील कसे पार पाडतात हे पाहावे लागेल.