अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे देशाचे ४७ वे राष्ट्रध्यक्ष म्हणून जानेवारी महिन्यात कार्यभार स्वीकारणार आहेत. मात्र यापूर्वी अमेरिकेत नोकरी किंवा शिक्षणासाठी गेलेल्या भारतीयांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. ट्रम्प सत्तेत आल्यानंतर काही मोठे धोरणात्मक बदल होणे अपेक्षित आहे. ट्रम्प यांनी याबद्दल आधीच घोषणा केली आहे. ट्रम्प प्रशासनाकडून बाहेर देशातून अमेरिकेत दाखल होणार्या नागरिकांवर बंधने लादली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतली अनेक प्रमुख विद्यापीठांकडून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आपल्या मायदेशी परतण्यास सांगितले जात आहे. विद्यार्थांसाठी काही मार्गदर्शक सूचनादेखील या विद्यापीठांकडून जारी करण्यात आल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे २० जानेवारी रोजी राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. यादरम्यान कार्यभार हाती घेताच, पहिल्याच दिवशी स्थलांतरित आणि आर्थिक धोरणांबाबत मोठे निर्णय घेणार असल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. २०१७ मध्ये ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात सात देशातील नागरिकांना अमेरिकेत येण्यास बंदी घालण्यात आली होती, त्या धर्तीवर यावेळीदेखील काही निर्णय घेतला जाण्याची भीती व्यक्त होत आहे. मॅसॅच्युसेट्स, ॲम्हर्स्ट (Amherst) विद्यापीठांनी याबद्दल सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आणि कर्मचार्यांना २० जानेवारीपूर्वी आपापल्या देशात परतण्याबद्दल विचार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नवे प्रशासन त्यांच्या कामाच्या पहिल्या दिवशी २०१७ मध्ये लागू केलेल्या प्रवास बंदीप्रमाणे काही नवीन धोरणे लागू करू शकते. त्यामुळे या मार्गदर्शक सूचना खबरदारीचा उपाय म्हणून तयार करण्यात आल्या आहेत, असे विद्यापीठाने जाहीर केले. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT)चे सहयोगी डीन डेव्हिड एलवेल यांनी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना अमेरिकेतील सत्ताबदलाच्या पार्श्वभूमीवर प्रवास करताना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी व्हिसा प्रक्रियेला उशीर लागणे, तसेच अमेरिकेबाहेर असताना नवीन धोरणे लागू झाल्यास निर्माण होणार्या अडचणी लक्षात घेण्याचा सल्ला दिला आहे. २०१७ मध्ये ट्रम्प प्रशासनाने प्रवासावर बंदी घातल्यानंतर भारतीय विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामुळे विद्यापीठाकडून देण्यात आलेल्या सूचना भारतीय विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या आहेत. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या रक्षणासाठी त्यांच्या विद्यापीठांकडून योग्य ती पावले उचलली जात आहेत. येल युनिव्हर्सिटी ऑफ इंटरनॅशनल स्टुडंट्स आणि स्कॉलर्सच्या कार्यालयाने संभाव्य स्थलांतरितांसबंधी धोरणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या भीतीबद्दल या महिन्याच्या सुरुवातीला एक वेबीनारचे आयोजन केले होते. इतर संस्थांकडून देखील अशा प्रकारच्या अडचणींचा सामना करण्यासाठी तयारी केली जात आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मात्र अद्याप औपचारिकरित्या कुठलीही मार्गदर्शक सूचना जारी केल्या नाहीत. पण सरकारने अमेरिकेतील परिस्थितीची कबुली दिली आहे. यासोबतच अमेरिकेतील भारतीय नागरिकांना प्रवासासंबंधी नियमांबद्दल माहिती घेत राहण्याचे आवाहन केले आहे.
उच्च शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती ही अमेरिकेला मिळते. भारताने २०२३-२४ मध्ये चीनला मागे टाकले असून अमेरिकेत सर्वाधिक भारतीय आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यी शिक्षण घेत आहेत. परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसंबंधी ओपन डोअर्स २०१४च्या अहवालानुसार, ३३१,६०२ भारतीय विद्यार्थ्यांनी अमेरिकेमधील शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेश घेतला होता. ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत २३ टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भारतीय विद्यार्थी अमेरिकेच्या शैक्षणिक क्षेत्रातील एक महत्वाचा घटक बनले आहेत.