न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्याच हेगले ओव्हल मैदानावर पहिलाच कसोटी सामना खेळवला जात आहे. २८ नोव्हेंबरला सुरू झालेला या सामन्यात पहिल्या दिवशी फलंदाजी करताना न्यूझीलंडने दिवसाचा खेळ संपेपर्यंत ८ गडी गमावून ३१९ धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा पहिला डाव ३४८ धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात इंग्लंडची फलंदाजी उत्कृष्ट झाली. हॅरी ब्रूकच्या १७१ धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर इंग्लिश संघाने पलटवार करत ४९९ धावा केल्या. ब्रूकशिवाय ऑली पोपने ७७ आणि बेन स्टोक्सने ८० धावांचे योगदान दिले.तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात खूपच खराब झाली. अवघ्या २३ धावांत संघाने दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या. यानंतर केन विल्यमसन आणि रचिन रवींद्र यांनी आघाडी घेत टी ब्रेकपर्यंत संघाची धावसंख्या २ बाद ६२ धावांपर्यंत नेली. यादरम्यान न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यमसनने नवा इतिहास लिहिला आहे.
केन विल्यमसनची ऐतिहासिक कामगिरी
पहिल्या डावात ९३ धावांची शानदार खेळी करणाऱ्या केन विल्यमसनने न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात २६ धावा पूर्ण करताच कसोटीत ९ हजार धावा पूर्ण केल्या. यासह विल्यमसन ९ हजार कसोटी धावा करणारा न्यूझीलंडचा पहिला फलंदाज ठरला. याआधी एकाही किवी फलंदाजाला हा आकडा गाठता आला नव्हता. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ९ हजार किंवा त्याहून अधिक धावा करणारा केन हा जगातील १९ वा फलंदाज ठरला आहे.केन विल्यमसनने आपल्या १०३व्या कसोटी सामन्यात हा ऐतिहासिक टप्पा गाठला. त्याने १८२ व्या डावात ९ हजार धावा पूर्ण केल्या. अशाप्रकारे तो कसोटीत जलद ९ हजार धावा पूर्ण करणारा ५वा फलंदाज ठरला. केनच्या आधी स्टीव्ह स्मिथ, ब्रायन लारा, कुमार संगकारा आणि युनूस खान यांनी जलद ९ हजार धावा पूर्ण करण्याचा मोठा पराक्रम केला होता.