Spread the love

विद्या बालन आपल्या आगामी चित्रपट ‘भूल भुलैया ३’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. तिने आपल्या करिअरच्या प्रवासाबद्दल बोलताना, सुरुवातीच्या काळात अनेक चित्रपटांमध्ये तिच्या ऐवजी दुसऱ्या अभिनेत्रींना संधी दिली गेली असल्याचं सांगितलं. एका मुलाखतीत विद्याने सांगितलं की, तिला एका तमिळ चित्रपटातून दोन दिवसांतच बदलण्यात आले. याबद्दल विचारल्यावर, निर्मात्याने तिचा अभिनय आणि नृत्याबद्दल अपमानास्पद टिप्पण्या केल्या होत्या. ‘गालट्टा इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत विद्या त्या अनुभवाची आठवण सांगताना म्हणाली, “मी एक तमिळ चित्रपट केला. मी त्यासाठी दोन दिवस शूटिंग केले आणि त्यानंतर मला बदलण्यात आले. मी माझ्या पालकांसह निर्मात्याच्या कार्यालयात त्याला भेटायला गेले. त्याने आम्हाला माझ्या शूट केलेल्या काही क्लिप्स दाखवल्या आणि माझ्या पालकांना म्हणाला, बघा ही कुठल्या अँगलने हिरोईन दिसते का ? तिला अभिनय आणि नृत्य करता येत नाही. हे ऐकून मी मनात विचार केला की , आधी मला अभिनय आणि नृत्य करू दे; मी तर फक्त दोन दिवसच शूटिंग केले आहे.”  विद्याने पुढे सांगितले, “या अनुभवानंतर सहा महिन्यांपर्यंत मी स्वतःला आरशात पाहू शकले नाही कारण मला मी कुरूप आहे असं वाटू लागलं होतं . जर तुम्हाला कुणाला नाकारायचे असेल, तर खरच नकार द्या, पण हे करताना शब्द नेहमी जपून वापरा. कारण शब्दांमध्ये खूप सामर्थ्य असते, ते एखाद्याला खूप जखम देऊ शकतात किंवा त्यांना सांभाळून घेऊ शकतात. या अनुभवातून मला शिकायला मिळाले की आपण नेहमी लोकांशी नेहमी दयाळूपणाने वागले पाहिजे. कारण त्या निर्मात्याच्या चुकीच्या वागणुकीमुळे माझा आत्मसन्मान सहा महिन्यांसाठी नष्ट झाला होता.”

विद्या बालनने १९९५ मध्ये ‘हम पाँच’ या टीव्ही शोद्वारे अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात केली. २००३ मध्ये तिने ‘भालो थेको’ या बंगाली चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. ‘परिणीता’ मध्ये तिने सैफ अली खान आणि संजय दत्त यांच्याबरोबर काम करताना प्रसिद्धी मिळवली. त्यानंतर विद्या विविध यशस्वी चित्रपटांमध्ये काम करत राहिली, त्यात ‘द डर्टी पिक्चर’ (२०११) साठी तिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आणि ‘कहानी’ (२०१२) मध्ये तिने मुख्य भूमिका साकारली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *