महाड- भरत गोगावले महाराष्ट्राचे लोकप्रिय नेतृत्व झालेय. रात्री अपरात्री मदतीला धावून जाणारा माणूस राज्याच्या मंत्रिमंडळात जाणार आहे. प्रभाकर मोरे ज्यावेळी राज्याचे मंत्री होते त्यावेळी विकासाची गंगा येथे वाहत होती ती नंतर थांबली. महाराष्ट्राला पुन्हा एकदा वैभव आणण्यासाठी भरत गोगावलेंना केवळ आमदार म्हणून नाही तर राज्याचा मंत्री म्हणून विधानसभेत पाठवायचे आहे असे आवाहन भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी महाडवासियांना केले.
भाजपा, शिवसेना, आरपीआय महायुतीचे महाड विधानसभा क्षेत्राचे उमेदवार म्हणून भरत गोगावले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. अर्ज दाखल करण्याआधी जाहीर सभा पार पडली. या जाहीर सभेत भाजपा गटनेते आ. दरेकर बोलत होते. याप्रसंगी उद्योगमंत्री उदय सामंत, विधानपरिषदेचे माजी आमदार अनिकेत तटकरे यांसह भाजपा, शिवसेना, आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना दरेकर म्हणाले की, महाड शहरात आज एक प्रचंड असा जनसागर उसळलेला पाहायला मिळतोय. यातूनच भरत गोगावले यांना लाखाचे मतदान देण्याचा निर्धार याच माझ्या भूमितील लोकांनी केलाय. सर्वसामान्य, गोरगरिबांसाठी दिवस रात्र काम करणारा अशा प्रकारचा नेता, कार्यकर्ता भरत गोगावले यांच्या रूपाने पाहिलेला आहे. महाड-पोलादपूरच्या विकासात मोठे योगदान देण्याचे काम भरत गोगावले यांनी केले असल्याचेही दरेकर म्हणाले.
दरेकर पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचा, तालुक्यांचा विकास झाला. परंतु कोकण विकासापासून वंचित राहिला. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या शिवसेनेला कोकणातील जनतेने समर्थन दिले होते. परंतु कोकणच्या जनतेसाठी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काही झाले नाही. म्हणून एकनाथ शिंदे यांना पवित्रा घ्यावा लागला. ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचे विचार बाजूला सोडले आणि काँग्रेसची तळी उचलायला लागले त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी छत्रपतींचा भगवा हाती घेऊन महायुतीचे सरकार बनवले. महायुती सरकारच्या गेल्या दोन वर्षाच्या काळात राज्याला विकासाकडे नेण्याचे काम झाले त्या शिंदे यांच्या सरकारमध्ये भरत गोगावले यांचा सिंहाचा वाटा होता असेही दरेकर म्हणाले.
तसेच निवडणुका आल्यात. जसा डोंबारी डमरू वाजवतो तसे विरोधकांचे सुरू आहे. त्यांच्याकडे कुठलीही कामाची शिदोरी नाही. महाड, पोलादपूर, माणगावसाठी काय केलात? गेली ४०-४५ वर्ष आमचा महाड विधानसभा विकासापासून वंचित होता त्याला सोनेरी दिवस आणण्यासाठी भरत गोगावले यांना आपल्याला निवडून द्यायचे आहे, असे आवाहनही दरेकर यांनी केले.
दरेकर पुढे म्हणाले, काँग्रेसला कुठलाही विकास करायचा नाही, केवळ जाती-पातीचे भावनिक राजकारण करायचे आणि राजकीय पोळी भाजण्याचा धंदा यांनी केला. ही आलेली गर्दी भाड्याची नाही तर अंतकर्नाणापासून आलीय. माझ्या मुलांचे भविष्य घडविण्यासाठी महाडमध्ये भरत गोगावलेच काहीतरी करू शकतात हा विश्वास येथील जनतेच्या मनात आहे. भरत गोगावले यांच्या प्रचारात भाजपाही ताकदीने खांद्याला खांदा लावून उतरून काम करणार आहे. विशेष म्हणजे ही निवडणूक दाखवून देणार आहे लोकसभेला चूक झाली. येथील मुस्लिम बांधव दाखवून देणार आहे माणुसकी काय असते. मुस्लिम समाजही मोठ्या ताकदीने गोगावले यांना मतदान करणार आहे.
सुभाष देसाई इकडे आले होते. उद्योगमंत्री असताना ह्यांनी काय काय उद्योग केले हे काढले तर पुन्हा इकडे ते फिरकणार नाहीत. रोजगाराला रोजगार, बेरोजगाराला रोजगार देण्याची भाषा करता. राज्याचे उद्योगमंत्री असताना देसाईनी किती उद्योग आणले. महाडच्या एमआयडीसीत काय केलेत. येथील मुलांना रोजगार मिळेल असे एक काम केला असाल तर आम्ही निवडणुकीतून माघार घेऊ. याउलट भरत गोगावले गोरगरिबांच्या मुलांसाठी काम करत असतात. तुमच्या नौटंकीला महाडची जनता भीक घालणार नाही. गद्दार बोलता. खरे गद्दार तर तुम्ही आहात. बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही महायुती सरकार बनवू शकलो. परंतु निवडून आले भाजपा सोबत आणि संगत केली काँग्रेससोबत. मग उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई गद्दार कोण आहे. तुम्ही स्वतःच्या मुलाला सांभाळू शकत नाही तो शिंदे यांच्या शिवसेनेत गेला, अशी तोफही दरेकरांनी डागली.
दरेकर पुढे म्हणाले, लोकांचा तुमच्यावर भरवसा राहिलेला नाही. उबाठाच्या उमेदवारांना कशासाठी निवडून द्यायचे? निवडून देण्यासाठी त्यांनी ५ कारणे सांगावीत. आम्ही सांगतो आम्हाला का निवडून द्या. केंद्रात भाजपा आणि महायुतीचे सरकार आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार होते उद्याही महायुतीचेच सरकार येणार आहे. केंद्रात आमचे सरकार आहे मग विकास कोण करू शकते? आपण करू शकतो, भरत गोगावले करू शकतात. आपल्याला जे हिणवतात भरत गोगावलेंनी कोट काढला तो कोट अंगावर चढवण्याचे काम महाडच्या जनतेला करायचेय. छत्रपतींच्या, डॉ. बाबासाहेबांच्या मातीतील हा भाग आहे. छत्रपतींचा भगवा घेऊन गोगावले पुढे जातात तेव्हा येथील मावळे त्यांच्याच मागे उभे राहतील, असा विश्वासही दरेकरांनी व्यक्त केला.
माझ्या लाडक्या बहिणींना मनापासून धन्यवाद देईन. उद्या हे सरकार येणार आहे त्याच्यात सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर तो लाडक्या बहिणींचा असेल. आमचे सरकार माझ्या लाडक्या बहिणी आणणार आहेत. महाराष्ट्राचा माहोल बदलण्याचे काम लाडक्या बहिणींनी केलेलं आहे. आम्ही लाडक्या बहिणींसाठी योजना आणतोय, अर्ध्या तिकिटात प्रवास देतोय, शेतकऱ्यांची काळजी करतोय, शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून ६-६ हजार रुपये दिले जाताहेत. हे सरकार सर्वांसाठी काम करतेय. विरोधकांनी चिंता करू नये योजनांसाठी पैसे कुठून आणायचे एवढे डोके आणि ताकद शिंदे, फडणवीस यांच्याकडे आहे.
आज महाराष्ट्र बदलतोय, विकासाकडे जातोय त्याला आपण साथ देणार आहोत की ज्यांनी या दोन वर्षात महाराष्ट्राचे वाटोळं केले त्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील उमेदवाराला निवडून देणार आहोत. महाड, पोलादपूर, माणगावचे चित्र बदलल्याशिवाय आम्ही राहणार नाही. भरत गोगावले महाराष्ट्राचे लोकप्रिय नेतृत्व झालेय. रात्री अपरात्री मदतीला धावून जाणारा माणूस राज्याच्या मंत्रिमंडळात जाणार आहे. प्रभाकर मोरे ज्यावेळी राज्याचे मंत्री होते त्यावेळी विकासाची गंगा वाहत होती. नंतर थांबली. महाराष्ट्राला पुन्हा एकदा वैभव आणण्यासाठी गोगावलेंना केवळ आमदार म्हणून नाही तर राज्याचा मंत्री म्हणून पाठवायचे असल्याचेही आवाहन उपस्थित जनसमुदायाला केले.