मुंबई : मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी शिवडी–न्हावा शेवा अटल सेतूवरील ५० टक्के टोल सवलत २०२६ वर्षअखेरपर्यंत कायम ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने शनिवारी घेतला. त्यामुळे वाहनचालकांना पुढील एक वर्ष सवलतीच्या दरात अटल सेतूचा वापर करता येणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अटल सेतू वापरणाऱ्या वाहनचालकांना सध्या टोलमध्ये ५० टक्के सवलत दिली जात असून, ही सवलत पुढील वर्षअखेरपर्यंत सुरू राहणार आहे. २१ किलोमीटर लांबीचा हा सेतू मुंबई आणि नवी मुंबईदरम्यानचा महत्त्वाचा दुवा ठरला असून, नव्याने सुरू झालेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठीही तो अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
दरम्यान, अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्या इलेक्ट्रिक मोटार कार आणि इलेक्ट्रिक बससाठी टोल पूर्णपणे माफ करण्याची तरतूद अधिसूचनेत समाविष्ट करण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यामुळे पर्यावरणपूरक वाहनांच्या वापराला चालना मिळणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) उभारलेल्या अटल सेतूसाठी ४ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ५० टक्के टोल सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या निर्णयानुसार १ जानेवारी २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत टोल आकारणीस मंजुरी देण्यात आली आहे. यासोबतच इतर वाहनांसाठी एकेरी प्रवासाचे टोल दरही निश्चित करण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे अटल सेतूचा वापर करणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला असून, मुंबई–नवी मुंबई दरम्यानची वाहतूक आणखी सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.