भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्सना घेऊन बोईंग स्पेस कंपनीचं ‘स्टारलायनर’ अंतराळ यान आज अखेर अवकाशात झेपावलं.
सुनीता यांच्यासोबत अंतराळवीर बॅरी विलमोरही या यानात आहेत. याबरोबरच ‘बोईंग’ ही अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात घेऊन जाणारी दुसरी खासगी कंपनी ठरली आहे. तर इलॉन मस्क यांची ‘स्पेस एक्स’ ही अशी कामगिरी बजावणार पहिली खासगी कंपनी होती.
याआधी दोन वेळा या यानाचं उड्डाण ऐनवेळी रद्द करावं लागलं होतं. पण अखेर 5 जून रोजी अमेरिकेत फ्लोरिडाच्या केप कॅनावराल येथील केनेडी स्पेस सेंटरमधून स्टारलायनरनं उड्डाण केलं. अमेरिकन अंतराळसंस्था नासानं अंतराळस्थानकात माणसं तसंच सामानाची ने-आण करता यावी, यासाठी खासगी कंपन्यांची मदत घ्यायला सुरुवात केली आहे.
अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्याचं काम आता जुन्या अंतराळयानांच्या ऐवजी स्पेस एक्स आणि बोईंग या कंपन्या करतील असं जाहीर करत नासाने या दोन्ही कंपन्यांसोबत समान काँट्रक्ट केले होते. यानुसार या कंपन्यांच्या कॅप्सूल्स वापरण्यात येतील आणि सहा मिशन्ससाठीचा हा करार आहे.
स्पेस एक्स (Space X) सोबतचा करार 2.6 अब्ज डॉलर्सचा होता तर बोईंगसोबतच 4.2 अब्ज डॉलर्सचा. स्पेस एक्स कंपनीने मानवी क्रू सह 2020 मध्ये चाचणी केली. याचा अर्थ बोईंग 4 वर्षं मागे आहे. कंपनीने गोष्टी सुधारण्यासाठी खूप पैसा खर्च केला आहे.
स्टारलायनर कसं आहे?
मागच्या बाजूला सर्व्हिस मॉड्यूल लावल्यानंतर स्टारलायनर अंतराळयान 5 मीटर उंच आणि 4.6 मीटर रुंद (16.5*15 फूट) आहे. अपोलो मोहीमांसाठी वापरण्यात आलेल्या कॅप्सूल्सपेक्षा स्टारलायनर रुंद आहे. यामध्ये 7 अंतराळवीरांना बसता येईल इतकी जागा आहे, पण नियमितपणे साधारण 4 अंतराळवीर यातून झेपावतील. 10 वेळा या कॅप्सूलचा वापर केला जाऊ शकतो.
इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या दिशेने प्रवास करताना क्रू या यानामधील आसनव्यवस्था, यानातली इतर जीवनावश्यक प्रणाली आणि नेव्हिगेशन – मार्गदर्शक यंत्रणा, ISS मध्ये सामान नेणारी यंत्रणा यांची पाहणी करेल.
शिवाय हे अंतराळवीर नवीन स्पेससूट वापरून त्यांचीही चाचणी घेतील. बॅरी विल्मोर आणि सुनीता विल्यम्स हे बोईंगचे नवीन निळ्या रंगाचे स्पेससूट घालतील. अमेरिकेच्या याधीच्या अंतराळवीरांनी वापरलेल्या स्पेससूट्सपेक्षा नवीन स्पेससूट्सचं वजन 40% कमी आहे आणि ते अधिक फ्लेक्झिबल – ताणता येण्याजोगे आहेत. या सूटचे ग्लोव्हज टचस्क्रीन वापरण्यासाठी योग्य आहेत. त्यामुळे अंतराळयानातील टॅब्लेट्स अंतराळवीरांना वापरता येतील.
स्टारलायनर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला 10 दिवस Docked म्हणजे जोडलेलं असेल आणि त्यानंतर ते पृथ्वीवर परतेल. अमेरिकेची यापूर्वीची अंतराळवीरांना परत घेऊन येणारी कॅप्सूल्स समुद्रात कोसळत होती. पण स्टारलायनर मात्र नैऋत्य अमेरिकेत कुठेतरी जमिनीवर लँडिंग करेल.
या यानाला असलेलं Heatshield – उष्णता कवच आणि पॅराशूट त्याचा जमिनीकडे झेपावण्याचा वेग कमी करतील आणि जमिनीवर यानाची कॅप्सूल आदळू नये म्हणून एअरबॅग्सही उघडतील.