‘२०२६ – सुरक्षा आणि पर्यावरण वर्ष’ उपक्रमाचा ठाण्यात भव्य शुभारंभ

 

ठाणे, दि. २२ (जिमाका): रस्ते सुरक्षा ही केवळ नियमपालनापुरती मर्यादित न राहता मानवी जीव वाचवणारी सकारात्मक सवय बनावी, या उद्देशाने ठाणे जिल्हा माहिती कार्यालय, प्रादेशिक परिवहन विभाग ठाणे आणि वेसॅक इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘२०२६ – सुरक्षा आणि पर्यावरण वर्ष’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा आज उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला.

या उपक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. उद्घाटनप्रसंगी वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ, कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष मनोज जालनावाला, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर, वेसॅक इंडियाचे संस्थापक व सुरक्षा अभ्यासक विजयकुमार कट्टी, माहिती अधिकारी प्रवीण डोंगरदिवे यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रस्ता सुरक्षा महिन्याच्या पार्श्वभूमीवर यावेळी ‘१५ चिन्हे – १५ कथा’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. रस्ते वाहतूक संकेतांवरील १५ बोधकथांचा समावेश असलेले हे पुस्तक मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये हार्ड कॉपी, ई-कॉपी आणि ऑडिओबुक स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच ‘R.E.A.C.H.’ (Responsibility, Empathy, Awareness, Compassion) या संकल्पनेवर आधारित ७८ रस्ता सुरक्षा पोस्टर्सचे अनावरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी रस्ता सुरक्षा ही प्रत्येक नागरिकाची वैयक्तिक व सामूहिक जबाबदारी असल्याचे नमूद करत वेगमर्यादा, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर यावर भर दिला. नियमांचे पालन करणारे नागरिक समाजासाठी प्रेरणास्थान ठरतात, असे त्यांनी सांगितले.

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी अपघातमुक्त ठाणे जिल्हा हे प्रशासनाचे प्रमुख ध्येय असल्याचे सांगितले. फक्त दंडात्मक कारवाईपेक्षा जनजागृती अधिक प्रभावी ठरते, ही बाब शासनाने ओळखल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष मनोज जालनावाला यांनी रस्ता सुरक्षेवरील उपक्रमांचे कौतुक करत, भारतात रस्ता अपघातातील मृत्यूंचे प्रमाण गंभीर असल्याकडे लक्ष वेधले. वेसॅक इंडियाचे संस्थापक विजयकुमार कट्टी यांनी रस्ता, औद्योगिक, अग्नि व पर्यावरण सुरक्षेचे शिक्षण लहान वयातच देण्याची गरज अधोरेखित केली.

प्रास्ताविकात जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी माध्यम प्रतिनिधींनी या मोहिमेला व्यापक प्रसिद्धी देण्याचे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *