१० पैकी १० विकेट्स! अंशुल कंबोजचा रणजी स्पर्धेत विक्रम

Spread the love

रणजी करंडक स्पर्धेत हरयाणाकडून खेळणाऱ्या अंशुल कंबोजने एका डावात १० पैकी १० विकेट्स घेत नवा विक्रम रचला आहे. केरळ संघाविरुद्ध रोहतक सुरू असलेल्या लढतीत अंशुलने शॉन रॉजरला बाद करत डावातील सगळ्या विकेट्स पटकावण्याचा मान मिळवला. रणजी करंडक स्पर्धेत एका डावात १० विकेट्स घेणारा तो केवळ तिसरा गोलंदाज ठरला आहे. १९५६-५७ मध्ये प्रेमांग्सू चॅटर्जी यांनी तर प्रदीप सुदरमन यांनी १९८५-८६ मध्ये १० विकेट्स घेण्याची करामत केली होती. भारतात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका डावात १० पैकी १० विकेट्स पटकावण्याचा मान सुभाष गुप्ते, अनिल कुंबळे आणि देबाशीष मोहंती यांनी पटकावला होता. शुक्रवारी खेळ सुरू झाला तेव्हा विक्रमासाठी अंशुलला २ विकेट्सची आवश्यकता होती. तीन षटकात २ विकेट्स घेत अंशुलने दुर्मीळ विक्रम नावावर केला. ३०.१ षटकात ९ निर्धाव षटकांसह ४९ धावांच्या मोबदल्यात अंशुलने १० विकेट्स पटकावल्या. केरळ संघात बाबा अपराजित, रोहन कन्नूमल, सचिन बेबी, जलाज सक्सेना अशा अनुभवी फलंदाजांचा समावेश होता. पण अंशुलच्या भेदक माऱ्यासमोर केरळच्या सर्वच फलंदाजांनी शरणागती पत्करली. केरळतर्फे रोहन कन्नूमल (५५), अक्षय चंद्रन (५९), मोहम्मद अझरुद्दीन (५३) यांनी अर्धशतकी खेळी केली. केरळचा डाव २९१ धावात आटोपला. २०२२ मध्ये अंशुलने हरयाणासाठी खेळायला सुरुवात केली. २०२३-२४ हंगामात विजय हजारे स्पर्धेत अंशुल हरयाणासाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अग्रस्थानी होता. यंदाच्या वर्षीच अंशुलने आयपीएल स्पर्धेत पदार्पण केलं होतं. मुंबई इंडियन्स संघाने त्याला ताफ्यात समाविष्ट केलं होतं. दोन सामन्यात त्याला खेळायची संधी मिळाली. अंशुलने आपल्या गोलंदाजीने चाहत्यांना प्रभावित केलं होतं. ग्लेन मॅकग्रा हा अंशुलचा आदर्श आहे. हरयाणातलं करनाल हे अंशुलचं गाव. बॉक्सिंगपटूंसाठी हे गाव प्रसिद्ध आहे. १४व्या वर्षी त्याने क्रिकेटवरच लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या अंशुलने आगामी आयपीएल लिलावाच्या पार्श्वभूमीवर दमदार कामगिरीसह फ्रँचाइजींना आपली दखल घेण्यास भाग पाडलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *