रामायणात राक्षसाची भूमिका वठविणाऱ्या एका ४५ वर्षीय कलाकाराने नाटक सुरू असतानाच एक भयंकर कृत्य केलं आहे. या कलाकाराने भर स्टेजवर जिवंत डुकराचे पोट फाडून त्याला मारले आणि त्याचे कच्चे मांस खाल्ले. ओडिशाच्या गंजम जिल्ह्यात सदर घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता राज्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच सोमवारी ओडिशाच्या विधानसभेतही या घटनेचा निषेध केला गेला. सदर कलाकाराचे नाव बिंबिधार गौडा असल्याचे सांगितले जाते. २४ नोव्हेंबर रोजी हिंजिली पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या रेलब गावात सदर नाटकाचा प्रयोग झाला होता. या प्रयोगावेळी गौडा याने हे धक्कादायक कृत्य केले. या प्रकरणी ‘प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध, अधिनियम’ आणि ‘वन्य जीव (संरक्षण) अधिनियम’ यानुसार आरोपी गौडावर आणि नाटकाच्या आयोजकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपाचे नेते बाबू सिंह आणि सनातन बिजुली यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला.हिंजली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीनिवास सेठी म्हणाले की, आम्ही रामायणामधील कलाकारावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला अटकही केली आहे. प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी नाटकाच्या निर्मात्यांकडून दर्शनी भागात साप दाखवले गेले होते. ओडिशा सरकारने मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सार्वजनिक मंचावर साप दाखविण्यास मनाई केली आहे. त्यामुळे आयोजकावरही यानिमित्ताने गुन्हा दाखल करण्यात आला.