सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळी झाडणारा व्यक्ती कोण? खलिस्तानी दहशतवाद्यांशी आहे कनेक्शन

Spread the love

पंजाबमधील शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांच्या वर एका व्यक्तीकडून गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला. या थरारक घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. या हल्ल्याच्या प्रयत्नानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली असून ही घटना घडली तेव्हा सुखबीर सिंग बादल हे त्यांना मिळालेल्या धर्मीक शिक्षेमुळे अमृतसर येथील सुवर्ण मंदिराबाहेर सेवादार म्हणून सेवा देत होते. सुदैवाने उपस्थित लोकांच्या सावधगिरीमुळे सुखबीर सिंग बादल हे थोडक्यात बचावले. या घटनेनंतर हल्लेखोराला तत्काळ ताब्यात घेण्यात आले असून हल्लेखोराचे नाव नारायण सिंग चौरा असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे.सुखबीर सिंग बादल हे त्यांचा पाय फ्रॅक्चर असल्याने व्हिलचेअरवर बसलेले होते. त्यावेळी त्यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. जवळच्या लोकांनी रोखल्याने चौरा याने झाडलेली गोळी भिंतीवर जाऊन लागली. दरम्यान गोळीबार करणाऱ्या नारायण सिंग चौरा याचा खलिस्तानी दहशतवाद्यांची संबंध राहिला आहे. चौरा याच्या विरोधात यापूर्वी बेकायदा कृत्यविरोधी प्रतिबंध कायद्याअंतर्गत (यूएपीए) अनेक वेळा गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच दहशतवादासंबंधी कारवायांमध्ये सहभाग समोर आल्याने नारायण सिंग चौरा याला तुरूंगात देखील टाकण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौरा हा १९८४ साली पाकिस्तानात निघून गेला होता आणि दहशतवादी कारवायांसाठी पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांची तस्करी करत असे. पाकिस्तानमध्ये असताना त्याने गनिमी कावा यासंबंधी आणि देश विरोधी पुस्तके देखील लिहिली. १९९०च्या दशकाच्या मध्यात तो भारतात परत आला आणि त्यानंतरदेखील तो दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग घेत राहिला. चौरा याला बुरैल जेलब्रेक प्रकरणात देखील अटक करण्यात आली होती. पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांच्या मारेकर्‍यांना २००३-२००४मध्ये चंदीगडच्या बुरैल तुरुंगात मोबाइल फोन आणि इतर अवैध साहित्य पुरवल्याचा त्याच्यावर आरोप होता. पुढे चौरा याची २०२२ मध्ये जामीनावर सुटका झाली. त्याच्यावर अमृतसर, रोपर, तरन तारन यासह पंजाबमधील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *