रणवीर सिंहने बॉलीवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. २०११ साली आदित्य चोप्राच्या ‘बॅण्ड बाजा बारात’ चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. रणवीरने आज बॉलीवूडमधील आघाडीच्या कलाकारांमध्ये स्थान मिळवले आहे. ‘लुटेरा’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक अशी घटना घडली की, त्यासाठी रणवीरला चक्क हेलिकॉप्टरद्वारे रुग्णालयात हलवावे लागले. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लुटेरा’ चित्रपटाच्या सेटवरील हा किस्सा नुकताच कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडाने ‘मैशेबल इंडिया’ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितला. ‘लुटेरा’चे दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी यानेदेखील या प्रसंगावर प्रकाश टाकला आणि रणवीरच्या भूमिकेसाठीच्या समर्पणाबद्दल सांगितले. चित्रपटाच्या शूटिंगबद्दल बोलताना विक्रमादित्य म्हणाला, “रणवीरला आपल्या पात्रातील वेदना प्रामाणिकपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची होती. मार्च महिन्यात डलहौसी येथे शूटिंग सुरू झालं होतं. एका सीनमध्ये रणवीरला आपल्या कंबरेतील गोळी काढण्याचा अभिनय करायचा होता. त्यानं मला विचारलं, ‘सर, हे मी खरंच वेदनांसह कसं करू शकतो?’ मी त्याला सहज अभिनय करण्याचा सल्ला दिला.”
खऱ्या वेदनेसाठी रणवीरने पिन केले पेपर क्लिप्स
दिग्दर्शक विक्रमादित्यने पुढे सांगितलं, “रणवीरने जाणीवपूर्वक काही ब्लॅक पेपर क्लिप घेतल्या आणि त्या आपल्या कंबरेजवळ पिन करून ठेवल्या. त्यानंतर वेदनेचा अनुभव घेण्यासाठी आणि घामाने भिजलेले दृश्य प्रभावी दिसावे यासाठी तो पर्वतावर वर-खाली धावत होता. दिवसाचा शेवट होताच त्याने त्या क्लिप्स काढल्या; पण तेव्हा त्याला खूप वेदना जाणवू लागल्या. मात्र, शूटिंगमुळे त्याला त्याचं दुःख पूर्णपणे जाणवलं नव्हतं.” या सीनच्या शूटिंगनंतर रणवीरच्या आरोग्यावर परिणाम झाला. विक्रमादित्य म्हणाला, “शूटिंगच्या शेवटी रणवीर अचानक बेशुद्ध झाला. त्याला तत्काळ बाहेर नेऊन रुग्णालयात हलवावं लागलं. दुसऱ्या दिवशी त्याला डलहौसीहून हेलिकॉप्टरनं हलवण्यात आलं. परिणामी, शूटिंगचं शेड्युल रद्द करावं लागलं.”