मुंबई : प्रतिनिधी
सिद्धार्थ महाविद्यालय रीयुनियन क्लबच्या वतीने चर्चगेट येथील गरवारे क्लबमध्ये आयोजित ‘सिद्धार्थ रत्न’ पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांना ‘सिद्धार्थ रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सिद्धार्थ कॉलेजचे माजी प्राचार्य ढोबरे सर यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमास मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर, मुंबई महापालिकेचे उपमहापौर संजय घाडी, सिद्धार्थ कॉलेजचे प्राचार्य म्हस्के सर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी विजय देसाई, सिद्धार्थ कॉलेज रीयुनियनचे सुरेश सालीयन, संजय जगदाळे, नगरसेवक विठ्ठल लोकरे, प्रभाग समिती अध्यक्ष व नगरसेवक प्रकाश दरेकर, मनसेचे प्रमोद गांधी यांच्यासह सिद्धार्थ कॉलेजचे प्राचार्य, माजी विद्यार्थी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरस्कार स्विकारल्यानंतर बोलताना आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की, सिद्धार्थ कॉलेज रीयुनियन क्लबने आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यात ‘सिद्धार्थ रत्न’ पुरस्काराने सन्मानित होणे हा अत्यंत भावूक आणि अभिमानाचा क्षण आहे. एका माजी विद्यार्थ्याला मिळालेली ही सर्वात मोठी पावती असल्याचे त्यांनी नमूद केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि त्यांनी स्थापन केलेल्या या ज्ञानमंदिरात शिक्षण घेण्याची संधी मिळणे हे आपले परमभाग्य असल्याचे सांगताना त्यांनी सिद्धार्थ कॉलेज ही केवळ शिक्षण संस्था नसून विचारांची जडणघडण करणारी संस्कारशाळा असल्याचे सांगितले.
या सोहळ्यात आमदार प्रविण दरेकर, उपमहापौर संजय घाडी आणि नगरसेवक प्रकाश दरेकर यांनाही सन्मानित करण्यात आल्याने आनंद द्विगुणित झाल्याचे त्यांनी नमूद केले. आजपर्यंतच्या यशामागे सिद्धार्थ कॉलेजचे संस्कार आणि सहकाऱ्यांचे पाठबळ असल्याचे त्यांनी सांगितले.
हा सन्मान सर्व सहकारी व हितचिंतकांना समर्पित करत सिद्धार्थ रीयुनियन क्लबच्या पदाधिकाऱ्यांचे आणि विद्यार्थी मित्रांचे शिंदे यांनी आभार मानले.