बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान ( Salman Khan ) याला ठार करण्याची धमकी देणाऱ्या ३५ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. ५ नोव्हेंबरला सलमान खानला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तसंच काळवीट शिकार प्रकरणी माफी माग किंवा पाच कोटींची खंडणी भरायला तयार राहा अशी मागणी करत ठार करण्याची धमकी देण्यात आली होती. मात्र या प्रकरणात आता एका तरुणाला कर्नाटकातून अटक करण्यात आली आहे. सलमान खानला धमकी देणाऱ्या ज्या तरुणाला अटक करण्यात आली त्या तरुणाचं नाव विक्रम असं आहे. त्याला कर्नाटकातून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आम्ही पुढील तपास करत आहोत असं पोलिसांनी सांगितलं आहे.
काळवीट शिकार प्रकरणी बिश्नोई टोळीकडून सलमान खानला ( Salman Khan ) ठार मारण्याची धमकी सातत्याने मिळते आहे. आजही मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला एका संदेशाद्वारे सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत वरळी पोलीस गुन्हा दाखल करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मागच्या काही दिवसांत सलमान खानला ( Salman Khan ) बिश्नोई टोळीकडून तीन वेळा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तर याच आठवड्यातील ही दुसरी धमकी आहे. धमकी देणाऱ्याने स्वतःला बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचे सांगितले आहे. फ्री प्रेस जर्नलने हे वृत्त दिलं आहे. पोलिसांमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सोमवारी रात्री धमकीचा हा संदेश आला असून त्यात लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. संदेश पाठविणाऱ्याने स्वतःला लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असल्याचे म्हटले आहे. “सलमान खानला ( Salman Khan ) जर जिवंत राहायचे असेल तर त्याने आमच्या मंदिरात येऊन माफी मागावी आणि पाच कोटी रुपये द्यावेत. जर त्याने असे केले नाही, तर आम्ही जिवंत सोडणार नाही. आमची टोळी अजूनही सक्रिय आहे”, अशा आशयाचा संदेश वाहतूक नियंत्रण कक्षाला प्राप्त झाल्याचे सांगण्यात आलं. मुंबई पोलिसांकडून सध्या या संदेशाचा स्त्रोत शोधला जात आहे. तसेच सलमान खानला ( Salman Khan ) दिलेल्या सुरक्षेचाही आढावा घेण्यात येत आहे. तसेच हा संदेश खरंच बिश्नोई टोळीच्या सदस्याने पाठविला आहे की, मागच्यावेळेसप्रमाणे कुणी खोडसाळपणा केला आहे. मागच्या आठवड्यात ३० ऑक्टोबर रोजी मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षालाही अशाचप्रकारे धमकी देणारा संदेश पाठविण्यात आला होता. तेव्हाही दोन कोटींची खंडणी मागण्यात आली होती. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर वरळी पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला. तेव्हा धमकी देणारी व्यक्ती वांद्रे पश्चिमेकडील जामा मस्जिदीजवळ असल्याचे कळताच तेथे जाऊन पोलिसांनी आजम मोहम्मद मुस्तफा याला पकडले होते. पोलीस चौकशीत त्याचा गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.