महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत मंगळवारी (दि. २९ ऑक्टोबर) रोजी संपल्यानंतर आता सर्वच पक्षांपुढे बंडखोरांना शांत करण्याचे आव्हान उभे राहिले आहे. सोमवार (दि. ४ नोव्हेंबर) पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत, त्यामुळे सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीकडून आता दिवाळीच्या दिवसात बंडखोरांची मनधरणी करण्याची वेळ आली आहे. या बंडखोरीमुळे आपलाच उमेदवार पडण्याची भीती अनेकांना वाटत आहे. सोमवारच्या आधी बहुतेक बंडखोरांनी अर्ज मागे घेतलेले असतील, असे दोन्ही आघाड्यांकडून सांगितले जात आहे. जवळपास ५० उमेदवारांनी बंडखोरी केली असून त्यापैकी ३६ उमेदवार हे महायुतीचे आहेत. यातही भाजपाचे सर्वाधिक १९ उमेदवार आहेत, तर त्यापाठोपाठ शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे १६ उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा केवळ एकच बंडखोर आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक १० बंडखोर उमेदवार निवडणुकीला उभे आहेत, तर उर्वरित चार उमेदवार शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे आहेत. याशिवाय मविआच्या घटक पक्षांनी १४ उमेदवार उभे केले आहेत. कुर्ला, दक्षिण सोलापूर, परंडा, सांगोला आणि पंढरपूर या प्रमुख मतदारसंघात बंडखोर निवडणुकीला उभे आहेत. काही ठिकाणी बंडखोरांनी आपल्या नातेवाईकांना निवडणुकीला उभे केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मागच्या आठवड्यात दिल्ली येथे झालेल्या बैठकीत महायुतीमधील बंडखोरांची समजूत काढण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना दिली होती. अर्ज करण्याची मुदत संपल्यानंतर बंडखोरांची समजूत काढण्याचे प्रयत्न होणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. “आमचा पक्ष मोठा आहे, त्यामुळे सहाजिकच आमच्याकडे इच्छुक उमेदवारांचीही संख्या जास्त आहे. पण, युतीमध्ये निवडणूक लढविताना काही मर्यादा येतात. इथे प्रत्येक उमेदवाराला न्याय देणे शक्य होत नाही. पण, आम्ही बंडखोरांशी संवाद साधू. आम्हाला आशा आहे की ते आमचे म्हणणे ऐकून अर्ज मागे घेतील”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. शिवाय काही मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होईल, असेही त्यांनी सांगितले. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नऊ बंडखोर उमेदवार भाजपाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात उभे राहिले आहेत. यामध्ये नवी मुंबईतील ऐरोली, मुंबईतील अंधेरी पूर्व (या ठिकाणी माजी चकमकफेम प्रदीप शर्मा यांची पत्नी आणि मुलगी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत) जळगाव जिल्ह्यातील पाचोरा आणि नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघातही बंडखोरी झाली आहे. तर शिवसेनेला जागा गेल्यामुळे भाजपाकडूनही बंडखोर निवडणुकीला उभे आहेत. यामध्ये रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि कर्जत, बुलढाणा, मुंबईतील बोरीवली आणि जालना विधानसभा मतदारसंघाचा प्रामुख्याने समावेश आहे. तसेच अजित पवार गटाच्या विरोधात भाजपाचे नऊ आणि शिवसेना शिंदे गटाचे सात बंडखोर उमेदवार निवडणुकीस उभे आहेत; तर अजित पवार गटाकडून केवळ एक बंडखोर नांदगाव विधानसभेत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या विरोधात उभा आहे.
महाविकास आघाडीतील चित्र काय?
काँग्रेसकडून कोपरी पाचपाखाडी, भायखळा आणि नागपूरमधील रामटेक अशा ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या उमेदवारा विरोधात बंडखोरी करण्यात आली आहे, तर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाकडून मानखुर्द शिवाजी नगरमध्ये समाजवादी पक्षाच्या अबू आझमींविरोधात उमेदवार देण्यात आला आहे. मुंबईतील वर्सोवा, बुलढाण्यातील मेहकर या ठिकाणीही उबाठा गटाचा बंडखोर उमेदवार उभा आहे. धारावीमधून काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांची बहीण ज्योती गायकवाड विरोधात शिवसेनेचा बंडखोर उमेदवार उभा होता. मात्र, त्याचा अर्ज मागे घेण्यात यश आले आहे तर दुसऱ्या बंडखोराचा अर्ज बाद झाला आहे. काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाकडून शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेस विरोधात बंडखोरी करण्यात आली आहे, तर काही ठिकाणी राष्ट्रवादीला इतर मित्रपक्ष किंवा स्वपक्षातूनच आव्हान मिळाले आहे. गुरुवारी (३१ ऑक्टोबर) महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत बंडखोरीबाबत निकाल लावण्याबाबत चर्चा झाली. या बैठकीनंतर काँग्रेसचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी रमेश चेन्निथला यांनी म्हटले की, या बैठकीत मैत्रीपूर्ण लढत होऊ नये, याबाबत आम्ही चर्चा केली. या चर्चेनंतर जर बंडखोरी शमली नाही तर मैत्रीपूर्ण लढत वैगरे काही नसेल, इतर विरोधकांप्रमाणेच या लढती होतील.