सराईत दुचाकी चोर जेरबंद; ५ गुन्हे उघड, काशिमीरा गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी

भाईंदर : सराईत मोटारसायकल चोरट्याला अटक करत गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-१, काशिमीरा पथकाने मोटारसायकल चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपीकडून मुंबईसह ठाणे परिसरातील चोरीच्या घटनांचा पर्दाफाश झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी भाईंदर (प) येथील बिशप स्कूल, व्हेज सागर हॉटेलजवळ फिर्यादी कमलेश ललित शाह यांनी पार्क केलेली २५ हजार रुपये किंमतीची पांढऱ्या रंगाची होंडा अ‍ॅक्टिवा (एमएच-०४-एचबी-२८०९) अज्ञात चोरट्याने लंपास केली होती. याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४६/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-१, काशिमीरा यांच्याकडे सोपविण्यात आला होता. पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी अयाज अली रहमत अली अन्सारी (वय ४१, रा. चिरागनगर, घाटकोपर पश्चिम) याची ओळख पटवली.
दरम्यान, १ एप्रिल २०२६ रोजी दहिसर चेक नाका, काशिमीरा परिसरात आरोपी मिळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपीने भाईंदरसह मुंबईतील आणखी चार मोटारसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
या कारवाईत भाईंदर, पायधुनी (मुंबई), एम.आर.ए. मार्ग आणि नागपाडा पोलीस ठाण्यातील एकूण ५ गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी हा सराईत दुचाकी चोर असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी मुंबई व ठाणे शहरात मोटारसायकल चोरीचे १६ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी ८ गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने दोषी ठरवले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सदर कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे आणि सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-१, काशिमीरा येथील पोलीस निरीक्षक सुशीलकुमार शिंदे व त्यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *