शाहरुख खानच्या ‘त्या’ सल्ल्याने बादशाहच्या करिअरची गाडी आली होती रुळावर; स्वतः खुलासा करत रॅपर म्हणाला, “त्यांनी चार वर्ष…”

Spread the love

गायक आणि रॅपर बादशाहने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या करिअरमध्ये आलेल्या वाईट काळाचा अनुभव शेअर केला. त्याच्या करिअरमध्ये एक काळ असा आला होता की त्याच्या गाण्यांना अपेक्षित यश मिळत नव्हते आणि त्यावर विचार करत असताना त्याची भेट शाहरुख खानशी झाली. शाहरुखने दिलेल्या सल्ल्यामुळे त्याला खूप प्रेरणा मिळाली आणि कठीण काळातून सावरत तो पुन्हा एकदा उभा राहू शकला. शाहरुखने त्याला दिलेला सल्ला खूप मोलाचा होता, असे बादशाहने एका मुलाखतीत सांगितले आहे.बादशाह एका मुलाखतीत म्हणाला, “एकदा एका विमान प्रवासात माझी शाहरुख सरांशी भेट झाली. मी सर्जनशीलतेच्या (क्रिएटिव्हिटीच्या) दृष्टिकोनातून वाईट काळातून जात होतो. माझ्या गाण्यांमध्ये काही नावीन्य येत नव्हते. याचदरम्यान विमान प्रवासात शाहरुख सरांच्या मॅनेजर पूजा ददलानी या माझ्या जागेजवळ आल्या, तेव्हा मी फोटो काढत होतो. तेव्हा त्यांनी मला विचारलं, ‘तुझं मॉडेलिंग झालं का?’ त्यानंतर त्या त्यांच्या जागेवर गेल्या आणि त्यांनी मला बोलावलं. मला वाटलं त्या एकट्याच असतील, पण तिथे शाहरुख सरसुद्धा बसले होते.” बादशाह पुढे म्हणाला, “जेव्हा मी शाहरुख सरांना भेटलो तेव्हा त्यांनी विचारलं की, संगीत कसं सुरू आहे. मी म्हणालो, ‘मी एक गाणं केलं जे चांगलं नव्हतं.’ त्यावर त्यांनी सांगितलं, ‘तर मग ते बनवू नकोस. मी सिनेमातून चार वर्ष ब्रेक घेतला होता, या काळात चार वर्ष मी फक्त पास्ता बनवला. चांगला पास्ता कसा तयार करावा हे शिकायला मला चार वर्ष लागली. यानंतर माझं जेव्हा मन झालं तेव्हाच मी मनापासून चांगले सिनेमे तयार केले.’ त्यामुळे जेव्हा तुला तुझ्या मनापासून वाटेल तेव्हा गाणं तयार कर, पण तेव्हा संपूर्ण मन लावून ते गाणं चांगलं बनव,” असं शाहरुख खान बादशाहला म्हणाला.बादशाहने पुढे सांगितले की, “शाहरुख सरांच्या त्या शब्दांनी मला खूप प्रेरणा दिली. जेव्हा शाहरुख खानसारख्या व्यक्तिमत्त्वाकडून आपल्याला मदत मिळते तेव्हा खूप चांगलं वाटत.” वरुण धवनच्या ‘बेबी जॉन’ या नव्या चित्रपटासाठी बादशाहने ‘गेट रेडी’ हे नवे गाणे तयार केले आहे. सध्या तो ‘इंडियन आयडल’च्या नवीन पर्वात जज म्हणून दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *