गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) अद्याप इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२५ साठी आपला नवीन कर्णधार निवडलेला नाही. गेल्या मोसमात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली संघाने विजेतेपद पटकावले होते. पण केकेआरने अय्यरला कायम ठेवले नाही. यानंतर पंजाब किंग्स (पीबीकेएस) ने मेगा लिलावात २६.७५ कोटी रुपयांची विक्रमी बोली लावून त्याला आपल्या संघात सामील केले आहे. अशा परिस्थितीत संघ आता कर्णधाराच्या शोधात आहे. त्यामुळे कर्णधारपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडू शकते? जाणून घेऊया. आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात केकेआरने चकित केले. केकेआरने मोठी बोली लावली आणि अष्टपैलू व्यंकटेश अय्यरला २३.७५ कोटी रुपयांना विकत घेतले. केकेआरने लिलावापूर्वी चार कॅप्ड आणि दोन अनकॅप्ड खेळाडूंसह सहा खेळाडूंना कायम ठेवले होते. अशा स्थितीत लिलावात त्यांची ५१ कोटी रुपयांची पर्स होती. फ्रँचायझीने व्यंकटेश अय्यरला विकत घेण्यासाठी जवळपास निम्मी पर्स खर्च केली. अशा परिस्थितीत संघ त्याला आपला पुढचा कर्णधार बनवेल, असा विश्वास होता. पण आता काही वृत्तांत असा दावा केला जात आहे की संघाची धुरा दुसऱ्या खेळाडूकडे सोपवण्याची शक्यता आहे.
अजिंक्य रहाणेची केकेआरच्या कर्णधारपदी लागणार वर्णी –
मीडिया रिपोर्ट्सनुसार, केकेआर माजी भारतीय कर्णधार आणि अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेला संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करु शकतो. फ्रँचायझीने अखेर १.५० कोटी रुपयांची बोली लावून अजिंक्य रहाणेला मूळ किमतीत खरेदी केले होते. केकेआरच्या जवळच्या सूत्राने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, “होय, या क्षणी हे ९० टक्के निश्चित आहे की अजिंक्य केकेआरचा नवा कर्णधार असेल. केकेआरने विशेषत: कर्णधारपदासाठी एक चांगला पर्याय म्हणून त्याला विकत घेतले आहे.”व्यंकटेश अय्यरला कर्णधाराचा अनुभव नाही. तसेच, संघाने त्याला मोठी बोली लावून खरेदी केले आहे. त्यामुळे खेळाडूवर चांगली कामगिरी करण्यासाठी मानसिकदृष्ट्या दबाव असतो. म्हणून केकेआर व्यंकटेश अय्यरवर कर्णधारपदाचा भार टाकणार नाही. तसेच संघाकडे दुसरा कर्णधाराचा पर्याय नाही, त्यामुळे अजिंक्य रहाणेकडे जबाबदारी देण्यात येणार आहे. अजिंक्य रहाणेचा कर्णधारपदाचा विक्रम उत्कृष्ट राहिला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली, मुंबई देशांतर्गत क्रिकेट २०२२-२३ मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे जेतेपद पटकावले होते. त्यानंतर या वर्षाच्या सुरुवातील ४२ वे रणजी जेतेपद आणि इराणी कप जिंकला आहे. याशिवाय रहाणेने २०१८ मध्ये भारत सी संघाचा कर्णधार म्हणून देवधर ट्रॉफी आणि पश्चिम विभागासाठी दुलीप ट्रॉफी २०२२-२३ जिंकली आहे. विशेष म्हणजे त्याने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचीही धुरा सांभाळली होती.