विराट कोहलीच्या नावे नकोसा विक्रम; उंचपुऱ्या तरण्याबांड गोलंदाजाने दाखवला तंबूचा रस्ता

Spread the love

 भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय भारतीय संघाच्या अंगलटी आल्याचे दिसत आहे. कारण भारतीय संघाने अवघ्या १० धावांत ३ विकेट्स गमावल्या आहेत. या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने एक नकोसा विक्रम केला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या बंगळुरू कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, पहिल्या डावात भारताला ९ धावांवर पहिला धक्का बसला तो कर्णधार रोहित शर्माच्या रूपाने, ज्याने टीम साऊदीच्या येणाऱ्या चेंडूचा चुकीचा अंदाज लावला आणि तो २ धावा करुन बाद झाला. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला विराट कोहलीही रोहित पाठोपाठ तंबूत परतला. त्याला आपले खातेही उघडता आले नाही. अशा प्रकारे विराट कोहली कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना आठ वर्षांनंतर शून्यावर बाद झाला आहे. पावसामुळे पहिला दिवसाचा खेळ रद्द झाल्यानंतर भारताने दुसऱ्या दिवशी सकाळी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माला सातव्या षटकात टीम साऊदीने बाद केल्यानंतर कोहलीने २०१६ नंतर प्रथमच कसोटीत शून्यावर बाद झाला आहे. त्याला विल्यम ओरुरकेने झेलबाद केले. वास्तविक, मानदुखीमुळे शुबमन गिल आजचा सामना खेळत नाही, त्यामुळे विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आली होती. पण तो ९ चेंडूंचा सामना केला आणि खाते न उघडता परतला.

विराट कोहलीने कसोटी कारकीर्दीत सर्वाधिक चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. पण जेव्हा-जेव्हा त्याला तिसऱ्या क्रमांकावर खेळायला पाठवले, तेव्हा त्याने संघाला निराश केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये २९ शतके झळकावणारा विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर एकही अर्धशतकही झळकावता आलेले नाही. यानंतरही कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय का घेण्यात आला? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

विराट कोहलीची तिसऱ्या क्रमांकावरील कसोटीतील कामगिरी –

कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना कोहलीची सरासरी केवळ १६.१६ राहिली आहे. आतापर्यंत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने केवळ ४१ धावांची सर्वोच्च खेळी साकारली आहे. म्हणजेच त्याच्या खात्यात अर्धशतकही नाही. आजच्या डावाचाही समावेश केला तर तो आतापर्यंत सात वेळा या क्रमांकावर फलंदाजीला आला आहे. विराट कोहली याआधी कसोटीतील ३२ डावांमध्ये शून्यावर बाद झाला आहे. विशेष म्हणजे शेवटच्या वेळी पण न्यूझीलंडविरुद्धच शून्यावर बाद झाला होता. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *