विधानसभा उपाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेतेपद विरोधी पक्षांना मिळावे, अशी मागणी काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रविवारी भेट घेऊन केली. विधानसभा अध्यक्षांची बिनविरोध निवड करण्यास विरोधकांनी सहकार्य केल्यास त्यांना उपाध्यक्षपद देण्याची पूर्वी राज्यात प्रथा होती, तर विरोधी पक्षनेतेपदासाठी त्या पक्षाचे विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या किमान १० टक्के आमदार निवडून आले असावेत, अशी अट आहे. सध्या कोणत्याही विरोधी पक्षाकडे २९ चे संख्याबळ नाही. मात्र महाविकास आघाडीने निवडणूकपूर्व युती केल्याने तीनही पक्षांचे एकत्रित संख्याबळ लक्षात घेऊन विरोधी पक्षनेतेपद महाविकास आघाडीतील पक्षाला देण्याची विरोधकांची मागणी आहे. उपाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेतेपद मिळावे, यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार, अस्लम शेख, उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी फडणवीस यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली. विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीने अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला आहे. सत्ताधाऱ्यांकडे अध्यक्षपद व विरोधकांकडे उपाध्यक्षपद असावे. भाजप व शिवसेनेच्या काही चुकांमुळे ही खंडित झालेली परंपरा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे भास्कर जाधव यांनी सांगितले. राज्य चालविण्यासाठी सत्ताधारी जेवढे महत्त्वाचे असतात, तेवढेच विरोधकही महत्त्वाचे असल्याने आम्हाला विरोधी पक्षनेते पद मिळावे. त्यासाठी संख्याबळ महत्त्वाचे नाही, अशी आमची भूमिका असून फडणवीस हे दोन्ही प्रस्तावांबाबत सकारात्मक असल्याचे जाधव यांनी नमूद केले. विधानसभा अध्यक्षांची बिनविरोध निवड व्हावी, ही राज्यात परंपरा आहे. विरोधीपक्ष नेत्यासंदर्भातही व्यवस्था असली पाहिजे. दिल्लीत आप पक्षाने भाजपचा विरोधी पक्षनेता होण्यासाठी मान्यता दिली होती.