विचंद्रन अश्विनचा WTC इतिहासात मोठा पराक्रम, नॅथन लायनचा रेकॉर्ड मोडत ठरला नंबर वन गोलंदाज

Spread the love

भारत वि न्यूझीलंडमध्ये पुणे येथे दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. या कसोटीत न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्याच सत्रात न्यूझीलंड संघाने दोन विकेट्स गमावले आहेत. हे दोन्ही विकेट रवीचंद्रन अश्विनने भारताला मिळवून दिले. न्यूझीलंडला पहिला धक्का कर्णधार टॉम लॅथमच्या रूपाने बसला आणि अश्विनने भारताला पहिले यश मिळवून दिले. तर विल यंगला बाद करत अश्विनने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये मोठा इतिहास घडवला आहे.

अश्विनने तोडला नॅथन लायनचा WTC मधील मोठा विक्रम

न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमला अश्विनने पायचीत करत १५ धावांवर माघारी धाडले, या विकेटसह अश्विनने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फिरकी गोलंदाज नॅथन लायनची बरोबरी साधली. ज्याने आतापर्यंत १८७ विकेट्स घेतले होते. टॉम लॅथमनंतर न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत विल यंगच्या रूपात त्याने आपली दुसरी विकेट घेताच, अश्विनने नॅथन लायनचा १८७ विकेट्सचा विश्वविक्रम मोडला. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासातील सर्वोच्च विक्रम मोडून रविचंद्रन अश्विन जगातील नंबर १ गोलंदाज बनला आहे. या मालिकेत न्यूझीलंड १-० ने आघाडीवर आहे. अश्विन आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. त्याने आतापर्यंत ३९ सामने खेळून १८८ विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याने २०.७० च्या सरासरीने आणि ४४.३६ च्या स्ट्राईक रेटने गोलंदाजी केली आहे. अश्विनने ९ वेळा चार विकेट्स आणि ११ वेळा पाच विकेट घेण्याचा पराक्रमही केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनने आतापर्यंत ४३ सामने खेळून १८७ विकेट्स घेण्यात यश मिळवले आहे. त्याने ११ वेळा चार आणि १० वेळा ५ विकेट्स घेतल्या आहेत. लायनची सरासरी २६.७० आणि त्याचा स्ट्राइक रेट ५८.०५ आहे. न्यूझीलंडने भारताविरूद्ध दुसऱ्या कसोटीसाठी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला असून दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीच्या जागी डावखुरा फिरकी गोलंदाज मिचेल सेंटरनचा समावेश केला आहे. भारताने संघात तीन बदल केले आहेत. मोहम्मद सिराज, केएल राहुल आणि कुलदीप यादव यांच्या जागी आकाश दीप, वॉशिंग्टन सुंदर आणि शुबमन गिल यांना प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *