मुंबई : वरळी परिसरात घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीवर शिधावाटप विभागाने धडक कारवाई करत मोठा साठा जप्त केला.
वरळी नाका येथील गणपतराव कदम मार्ग वरील ‘सूरज वल्लभदास चाळ’ परिसरात अवैधरित्या गॅस सिलेंडर साठवून चढ्या दराने विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत एचपी गॅस कंपनीचे पाच किलो वजनाचे सहा भरलेले आणि ५८ रिकामे सिलेंडर जप्त करण्यात आले. तसेच सुपर गॅस कंपनीचे चार किलोचे ६४ भरलेले आणि १२ किलोचे १९ भरलेले सिलेंडर हस्तगत करण्यात आले.
याशिवाय बारा, चार आणि दोन किलो क्षमतेचे विविध आकारांचे २५ रिकामे सिलेंडरही आढळून आले.
नियंत्रक शिधावाटप कार्यालयाच्या फिरत्या पथकाने आणि कार्यालय क्रमांक २१ च्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. दरम्यान, गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.