वनदावे प्रकरणांतील ११० फाईल्स अपूर्ण; तपासणी अहवाल तातडीने पाठविण्याची मागणी

भाईंदर : मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्र. ६ मधून ठाणे उपविभागीय कार्यालयाकडे पाठविण्यात आलेल्या वनहक्क/वनदावे प्रकरणांपैकी ११० फाईल्स तपासणी अहवालाअभावी अपात्र ठरल्याची बाब समोर आली आहे. याबाबत तातडीने तपासणी अहवाल पाठविण्याची मागणी श्रमजीवी संघटना महाराष्ट्रच्या वतीने करण्यात आली आहे.
संघटनेचे तालुकाध्यक्ष वसीम पटेल व तालुका सचिव मनीषा पौंडकर यांनी सहाय्यक आयुक्त तथा प्रभाग अधिकारी, प्रभाग समिती क्र. ६ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग समिती क्र. ६ मधून एकूण ५०३ वनदावे प्रकरणांच्या फाईल्स पुढील कार्यवाहीसाठी ठाणे उपविभागीय कार्यालयाकडे पाठविण्यात आल्या होत्या. मात्र त्यापैकी ११० फाईल्ससोबत प्रभाग अधिकाऱ्यांचा आवश्यक तपासणी अहवाल नसल्याने ती प्रकरणे अपूर्ण कागदपत्रांमुळे अपात्र ठरविण्यात आली आहेत. यामुळे संबंधित आदिवासी लाभार्थींना अनावश्यक विलंब व त्रास सहन करावा लागत असल्याचे संघटनेने नमूद केले आहे. वनदावे प्रकरणांमध्ये स्थानिक प्रशासनाचा तपासणी अहवाल महत्त्वाचा असल्याने संबंधित फाईल्सची तातडीने पडताळणी करून अधिकृत अहवाल ठाणे उपविभागीय कार्यालयाकडे पाठवावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
सदर प्रकरणांवर सकारात्मक कार्यवाही करून अपात्र ठरलेल्या फाईल्स पुन्हा पात्रतेसाठी विचाराधीन कराव्यात, अशी मागणीही श्रमजीवी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *