‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत सध्या चारुलता आणि चारुहास यांच्या लग्नाचा सीक्वेन्स चालू आहे. मात्र, चारुलताच्या रुपात घरात वावरणारी बाई ही अधिपतीची खरी आई नसून भुवनेश्वरी असल्याचं अक्षराचं ठाम म्हणणं असतं. पण, तिच्यावर विश्वास ठेवण्यास कोणीही तयार होत नाही. परिणामी, भुवनेश्वरी सुनेची रवानगी मानसिक रुग्णालयात करते. याठिकाणी तिला वेडं ठरवण्यासाठी अनेक कट-कारस्थानं रचली जातात. पण, अक्षरा मुळातच हुशार असते. जवळच्या मैत्रिणीला बोलवून ती एक नवा प्लॅन बनवते. एकीकडे अक्षरा रुग्णालयात असताना दुसरीकडे सूर्यवंशी कुटुंबीयांच्या घरात चारुलता आणि चारुहासच्या लग्नाची जंगी तयारी सुरू असते. हे लग्न काही करून थांबवायचं असं अक्षरा ठरवते. यासाठी तिला पुरावे गोळा करायचे असतात. मैत्रिणीचा फोन अक्षरा उशीमध्ये लपवून स्वत:कडे ठेवते. ज्यावेळी अक्षराला त्रास देण्यासाठी बजरंग येतो. ती आधीच मोठ्या हुशारीने सावध होते आणि फळांमागे आपला मोबाइल लपवून ठेवते. व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरू असताना या सगळ्या कारस्थानामागे भुवनेश्वरी आहे असं बजरंगकडून वदवून घेण्याचा अक्षरा प्रयत्न करत असते. शेवटी आता भर मांडवात येऊन अक्षरा चारुलता आणि चारुहासचं लग्न थांबवणार आहे. अधिपतीच्या डोक्यावर हात ठेवून तुम्ही चारुलता आई नाही, भुवनेश्वरी मॅडम आहात शपथ घ्या असं ती सासूला सांगते. अधिपतीवरचं प्रेम आणि अक्षराजवळ पुरावे लक्षात घेऊन आता लवकरच भुवनेश्वरी चारुहासची माफी मागणार आहे. भुवनेश्वरी म्हणते, “माफ करा आम्ही चारुलता बाईंचं सोंग घेऊन इथे आलो.” यावर चारुहास म्हणतो, “तुझी लायकी नाहीये तिचं नाव घेण्याची…माझं चारुचं रुप घेऊन तू माझ्या भावनांशी खेळली आहेस. आताच्या आता निघ इथून नाहीतर… ” पुढे भुवनेश्वरी म्हणते, “आम्ही जे काही केलं ते तुमच्यावरच्या आणि अधिपतीवरच्या प्रेमापोटी केलं आहे. आता तुम्हीच न्याय करा, आमची फसवणूक मोठी की आमचं प्रेम” भुवनेश्वरीचं खरं रुप समोर आल्यावर अधिपती बावरून जातो. पुन्हा एकदा बायकोवर अविश्वास दाखवल्याने त्याला काय बोलावं हे सुद्धा सुचत नसतं. त्यामुळे आता हे सूर्यवंशी कुटुंबीय भुवनेश्वरीला माफ करणार की घराबाहेर काढणार हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल.