मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रुपाली निलेश चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत हा निर्णय घेतल्याचे समजते.
चाकणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्राद्वारे आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. वैयक्तिक कारणास्तव स्वेच्छेने राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. तसेच, आजवर मिळालेल्या सहकार्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री व सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
दरम्यान, ‘कॅप्टन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात याच्याशी संबंधित वादामुळे चाकणकर यांच्यावर जोरदार टीका सुरू होती. नाशिकमधील गंभीर गुन्ह्यांमध्ये नाव असलेल्या खरातसोबतचे फोटो आणि पाद्यपूजेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती.
महिलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या आयोगाच्या प्रमुखांवरच असा वाद निर्माण झाल्याने सामाजिक आणि राजकीय स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. विरोधकांसह विविध संघटनांनीही या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती.
सूत्रांच्या माहितीनुसार, वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कार्यालयाकडून सूचनांनंतर चाकणकर यांनी हा निर्णय घेतला. त्यांच्या राजीनाम्यामुळे महिला आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील चौकशीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या घडामोडीमुळे राज्यातील राजकारणात नवा वाद निर्माण झाला असून, पुढील नियुक्तीबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.