बॉलीवूड सेलिब्रिटींबरोबर त्यांची मुलं सुद्धा सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असतात. सध्याच्या घडीला आलिया-रणबीरची लेक राहा तर सर्वांची लाडकी स्टारकिड म्हणून ओळखली जाते. याशिवाय रितेश-जिनिलीयाच्या दोन्ही मुलांचं सुद्धा सोशल मीडियावर नेहमीच कौतुक केलं जातं. या जोडप्याची मुलं पापराझींसमोर हात जोडून त्यांना नमस्कार करतात. आपले फोटो आपल्या आई-बाबांनी केलेल्या कामामुळे काढले जातात याची पुरेपूर जाणीव रितेश-जिनिलीयाने राहील अन् रियानला करून दिली आहे. त्यामुळेच या दोघांच्या संस्कारांचं नेटकरी कायम कौतुक करतात. मुलांना दिलेले संस्कार आणि पालकत्व यावर अभिनेत्रीने नुकत्याच ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. रितेश-जिनिलीयाने २०१२ मध्ये लग्न केलं. या जोडप्याला रियान अन् राहील अशी दोन मुलं आहेत. यापैकी रियान १० वर्षांचा तर, राहीलचं वय ८ वर्ष आहे. जिनिलीया म्हणते, “मातृत्व हा माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर अनुभव आहे. कारण, आपल्या मुलांचा सांभाळ करणं, त्यांना योग्य संस्कार देऊन वाढवणं यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट असू शकत नाही. माझ्या मुलांमुळे मला माझ्यातला अनेक कलागुणांची देखील जाणीव झाली. या सगळ्या प्रवासात रियान आणि राहीलने सुद्धा मला तेवढाच पाठिंबा दिला.” जिनिलीया पुढे म्हणते, “मी त्या दोघांना नेहमी सांगते कधीही स्वत:ची तुलना इतरांबरोबर करू नका. तुम्हाला दुसऱ्यांकडे पाहण्याची काहीच गरज नाही. याउलट आपण स्वत:वर मेहनत घेतली पाहिजे. मला स्वत:ला मी लहान असताना, माझी इतर मुलांशी तुलना केलेलं आवडायचं नाही आणि प्रत्येक लहान मुलात काही ना काही वेगळं नक्कीच असतं या ठाम मताची मी आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात सर्वांनी असंच जगलं पाहिजे. रोज सकाळी आम्ही प्रार्थना करतो आणि मी त्यांना सांगते नेहमी स्वत:ला अजून चांगलं सिद्ध कसं करता येईल यासाठी प्रयत्न करत राहा.” “मैदानी खेळ खेळणं…हा प्रत्येक मुलाच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे. यामुळे त्यांची शारीरिक हालचाल होते. त्यामुळे माझी दोन्ही मुलं फुटबॉलचा सराव कधीच चुकवत नाहीत. आम्ही फिरायला बाहेरगावी वगैरे जातो ते सुद्धा त्यांच्या सुट्ट्यांचं, फुटबॉल सामन्यांचं वेळापत्रक पाहून जातो. एखादी स्पर्धा वगैरे असेल…तर, आम्ही सगळे मिळून चर्चा करतो आणि व्हेकेशन रद्द करून दोन्ही मुलांच्या आवडीनिवडी जपण्याला प्राधान्य देतो. कारण, खेळताना या दोघांना कळतं की, हरणं आणि जिंकणं हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे. एकदा हरलो तर जग संपत नाही. त्यामुळे प्रत्येकवेळी आपल्याला आपल्या चुका सुधारण्याची संधी मिळते.” असं जिनिलीयाने सांगितलं.
दोन्ही मुलांसाठी रितेश वाजवतो खास शिट्टी…
रितेशची वडील म्हणून जबाबदारी याबद्दल सांगताना जिनिलीया ( Genelia Deshmukh ) म्हणते, “रितेश आणि मी आम्ही दोघांनी मिळून आमच्या मुलांना काय आवडतंय त्यातून आमचा आनंदा शोधला. कारण, मुलं मोठी झाल्यावर पालकांनी आपल्याला खेळणी दिली वगैरे हे सर्व त्यांना आठवणार नाही…पण, त्यांच्याबरोबर घालवलेले क्षण नक्कीच आठवतील. आताही माझी मुलं फुटबॉल खेळायला मैदानात उतरतात तेव्हा ते प्रत्येकवेळी रितेशच्या शिट्टीची वाट पाहत असतात. खेळ सुरू होण्यापूर्वी रितेश एक त्याच्या स्टाइलने शिट्टी मारतो…आणि मुलांना प्रोत्साहन देतो. पालकत्वासाठी आधीच्या काळातील संस्कार आणि आताचे समकालीन विचार या दोन्ही गोष्टींचा समतोल राखून मुलांसाठी काय योग्य ठरेल याचा विचार करावा लागतो. आताचा काळ खूप बदलला आहे त्यामुळे आधीच्या काळात असं होतं वगैरे अशी तुलना आपण नाही करू शकत. आम्ही दोघंही आमच्या पद्धतीने मुलांशी संवाद साधून त्यांच्यामध्ये मिळून मिसळून राहण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या मुलांशी चर्चा करणं, त्यांचं मत जाणून घेणं हा सुद्धा संगोपनातील महत्त्वाचा घटक आहे असं मला वाटतं.”