राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे भायखळा विधानसभा तालुका अध्यक्ष सचिन कुर्मी ऊर्फ मुन्ना (४५) यांच्या हत्येचा तपास गुन्हेशाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. याप्रकारणी भायखळा पोलिसांनी तिघांना अटक केली होती. पूर्व वैमनस्यातून त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. याप्रकरणी भायखळा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
भायखळा येथील रेतीवाला इंजस्ट्रीज समोरील अनंत पवार मार्गावर तिघांनी सचिन यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली होती. आनंदा अशोक काळे ऊर्फ आण्या (३९), विजय ज्ञानेश्वर काकडे ऊर्फ पप्या (३४) व प्रफुल्ल प्रवीण पाटकर (२६) यांना अटक करण्यात आली. मृत सचिन कुर्मी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांचा जवळचा कार्यकर्ता होता. अनेक वर्षांपासून ते भुजबळ कुटुंबियांचे कट्टर समर्थक होते. भुजबळ कुटुंबियांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी सचिन कुर्मीही त्यांच्यासोबत गेले. ते राष्ट्रवादीचे (अजित पवार) भायखळा तालुका अध्यक्ष म्हणून काम करीत होते.