सांगलीचे माजी खासदार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) नेते संजयकाका पाटील यांनी आज (५ डिसेंबर) त्यांच्या पक्षाचे प्रमुख अजित पवार यांची भेट घेतली. अजित पवार हे आज राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी त्यांच्या पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांनी आज त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर संजय काका पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी पाटील म्हणाले, “आमचे नेते अजित पवार हे सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. हा एक विक्रम आहे. यामुळे आमच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. स्वतः अजित पवार देखील खूप उत्साही आहेत”. यावेळी पाटील यांना विचारण्यात आलं की आज तुमच्या पक्षाकडून अजित पवारांव्यतिरिक्त आणखी कोण शपथ घेणार आहे? यावर पाटील म्हणाले, “अजून तरी तशी माहिती समोर आलेली नाही. बहुतेक आज एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल, असं मला दिसतंय. माझ्याकडे सध्या कोणतीही अधिकृत माहिती नाही”.संजय काका पाटील यांच्याबरोबर आज सकाळी राष्ट्रवादीचे इतरही नेते अजित पवारांना भेटले. यामध्ये दिलीप वळसे पाटील. दत्तात्रय भरणे. हसन मुश्रीफ यांचा समावेश होता. या भेटीबाबत संजयकाका पाटील यांना विचारण्यात आलं की आज या वरिष्ठ नेत्यांनी मंत्रीपदांबाबत काही चर्चा केली का? किंवा मंत्रीपदी कोणाकोणाची वर्णी लागणार आहे? यावर पाटील म्हणाले, “महायुतीच्या नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जितकी मंत्रीपदं मिळतील तितकीच मंत्रीपदं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने देखील मागितली आहेत. ही वरच्या स्तरावरील चर्चा आहे. त्याववर वरिष्ठांमध्ये विचारविनिमय होऊन निश्चितपणे यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल”. पाटील हे टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.
राष्ट्रवादीला किती मंत्रिपदं मिळणार?
यावेळी पाटलांना विचारण्यात आलं की नव्या सरकारमध्ये तुमच्या पक्षाला किती मंत्रींपद मिळू शकतात? त्यावर संजय काका म्हणाले, “साधारण ११ ते १२ मंत्रीपदं आम्हाला मिळू शकतात. तशीच आमची मागणी आहे. शिवसेनेला देखील तितकीच मंत्रीपदं दिली जाऊ शकतात”.दरम्यान यावेळी संजयकाका पाटील यांना विचारण्यात आलं की तुम्हाला अजित पवारांनी काही आश्वासन दिलं आहे का? तुमच्या पक्षाच्या विधान परिषदेच्या काही जागा आता रिकाम्या होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला पक्षाने विधान परिषदेबाबत काही शब्द दिला आहे का? यावर पाटील म्हणाले, “याविषयी चर्चा करण्याची आज वेळ नाही आणि मी त्यासाठी भेटलेलो नाही. आमचा नेता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहे. त्यामुळे त्यांना मी शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे. सध्या या विषयावर चर्चा करणं योग्य नाही.