अलिबाग- आधी उरण आणि आता अलिबाग अशा दोन्ही जागांवर शिवसेना ठाकरे गटाने दावा सांगितला आहे. शेकापनेही दोन्ही जागांवर आधीच आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. जिल्ह्यात पक्षसंघटन चांगले असल्याने शेकापने अलिबाग, पेण, उरण आणि पनवेल या चार मतदारसंघाची महाविकास आघाडीकडून मागणी केली आहे. चारही मतदारसंघातून त्यांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. अलिबाग मधून चित्रलेखा पाटील, पेण मधून अतुल म्हात्रे, उरण मधून प्रितम म्हात्रे तर पनवेल मधून बाळाराम पाटील हे शेकापचे उमेदवार असणार आहेत. शिवसेना ठाकरे गट शेकापशी जुळवून घेण्याच्या मानसिकतेत नाही. ठाकरे गटाने आधी उरण मधून माजी आमदार मनोहर भोईर यांना उमेदवारी दिली. २०१४ मध्ये मनोहर भोईर हे शेकापच्या विवेक पाटील यांचा पराभव करत ७०० मतांनी निवडून आले होते. गेल्या निवडणूकीत मनोहर भोईर यांचा भाजपच्या अपक्ष बंडखोर उमेदवार महेश बालदी यांच्याकडून पराभव झाला होता. मात्र या निवडणूकीत शिवसेनेच्या भोईर यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. तर शेकापचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होता. त्यामुळे उरण मतदारसंघावर दावा सांगत ठाकरे गटाने मनोहर भोईर यांना निवडणूकीत उतरवले आहे. अलिबागमधून जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांना निवडणूक लढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सुरेंद्र म्हात्रे यांना मातोश्रीवर बोलावून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी हे आदेश दिले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा अधिकच वाढण्याची शक्यता आहे. अलिबाग मधून शिवसेनेचे महेंद्र दळवी गेल्या निवडणूकीत शेकाप उमेदवार सुभाष पाटील यांचा पराभव करून निवडून आले होते. त्यामुळे अलिबागची जागा शिवसेनेलाच मिळावी अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाची मोठीच अडचण झाली आहे.