मुंबई- विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने स्पष्टपणे जनाधार दिलाय. भाजपा महायुतीचे सरकार येईल अशा प्रकारचे चित्र आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, काँग्रेसचा मुख्यमंत्री होण्याचा प्रश्न तर दूरच राहिला. मुख्यमंत्री हा महायुतीचाच होईल, असा ठाम विश्वास भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला समर्थन दिले. त्यांच्यातच पाडापाडी सुरू आहे हे महाराष्ट्र पाहतोय. ज्या पक्षांत एकवाक्यता नाही ते मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवायला निघालेत. मुंगेरीलाल के हसीन सपने असेच नाना पटोलेंच्याबाबतीत बोलावे लागेल. दरेकर पुढे म्हणाले की, एक्सिट पोल हा अंतिम नसतो. ८-९ एक्सिट पोलने महायुतीचे सरकार येईल असा अंदाज वर्तविला आहे. एखादा अपवादात्मक एक्सिट पोल असू शकतो. काही झाले तरी राज्यात महायुतीचेच सरकार बनेल यावर आमचा विश्वास आहे. तशा प्रकारचे वातावरण, महाराष्ट्रातील जनतेने मतदान केल्याचे दिसतेय. तसेच अपक्ष निश्चितच काही प्रमाणात निवडून येतील. अपक्ष हे सत्ता बनते त्या बाजूने सातत्याने असतात. महायुतीचे सरकार बनत असताना अपक्ष महायुतीच्या बाजूने राहतील. काही अपक्ष महायुतीतील पक्षाचेच निवडून येण्याची जास्त शक्यता आहे. ते आपल्या मूळ घरात येतील. संजय शिरसाट यांच्या विधानावर बोलताना दरेकर म्हणाले की, शिरसाट यांची भूमिका ही पक्षाची अधिकृत भुमिका असल्याचे वाटत नाही. जर ती पक्षाची अधिकृत भुमिका असती तर त्यावर भाष्य करणे योग्य असते. उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या, महाविकास आघाडीच्या विरोधात शिंदे यांनी निवडणूका लढवल्या आहेत. ज्या विचारातून त्यांनी महायुती किंवा भाजपासोबत युती केलीय अशा प्रकारची तिळमात्र गोष्ट होऊ शकत नाही, असा ठाम विश्वास आहे. बच्चू कडू यांच्या विधानावर दरेकर म्हणाले की, कडू राणा भीमदेवी थाटात बोलण्यात पटाईत आहे. त्यांचे किती उमेदवार निवडून येताहेत ते जाहीर करावे. त्यांची स्वतःची जागा धोक्यात आहे. निवडून येताना त्यांचीच दमछाक होणार आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर दरेकर म्हणाले की, राहुल गांधी यांनी अमेरिकेत जावे. परदेशातच त्यांचे जास्त उपक्रम चालू असतात. तेथे जाऊन तिथल्या सरकारला गुन्हा दाखल झाला आहे तर अटकेची कारवाई करण्याची मागणी करावी. इथे बसून तिथे काय चालू आहे यावर भाष्य करणे आणि त्या आधारे सरकार पडणार म्हणजे आत्याबाईला मिशा असत्या तर… अशा प्रकारचे त्यांचे वक्तव्य बालिशपणाचे आहे. संजय राऊत यांच्या दाव्यावर दरेकर म्हणाले, राऊतांचा दावा म्हणजे प्रचंड आत्मविश्वासाचा सागर असतो. त्यांनी फक्त एवढेच सांगावे आमचा मुख्यमंत्री होणार आणि संजय राऊत मुख्यमंत्री झाले तर आश्चर्य वाटायला नको, एवढेच बोलायचे ते राहिलेत. संजय राऊत यांच्या बोलण्याला कुठल्याही प्रकारचा आधार नसतो. निराधार, बेताल, कुठलीही पार्श्वभूमी नसणारी वक्तव्य राऊत यांची असतात. ते वाट्टेल ते बोलतात आणि आरोप करतात. त्याचबरोबर बिटकॉईन आणि कॅश प्रकरण हे अत्यंत गंभीर विषय आहेत. बिटकॉईनसंदर्भात सुप्रिया सुळे यांचे नाव पुढे येतेय. त्यातून पैसे उभा केल्याचे समोर येतेय. त्यात गौरव मेहता हे जे नावं समोर येतेय त्यावर ईडीच्या धाडी पडल्याचे समजतेय. याचे धागेदोरे महाविकास आघाडीच्या कुणापर्यंत गेलेत ते यथावकाश कळेल, असेही दरेकर म्हणाले. दरेकर पुढे म्हणाले की, मतदान टक्केवारी वाढण्याला आमची मातृसंस्था आरएसएस कारणीभूत आहे. त्यांनी मतदानाचा टक्का वाढला पाहिजे अशा प्रकारचे अभियान सुरू केले. हजारोंच्या छोट्या मोठ्या बैठका घेऊन सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. तसेच बूथ स्तरावर मतदान वाढविण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. लोकसभेला मतदान यंत्रणा ढिसाळ होती. आता ७००-८०० चे बूथ करून गर्दीमुळे जो मतदार मतदानाला जात नव्हता ते आता सोपे झाले. अशा सर्व कारणांनी मतदान वाढले आहे.
महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले
महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आणली. 2 कोटी ६० लाख महिलांना थेट याचा लाभ होतोय. ही योजना बंद करायला काँग्रेसवाले गेले होते. अशावेळी चुकून काँग्रेसचे सरकार आले तर ही योजना बंद होईल अशी भीती लाडक्या बहिणींच्या मनात होती. आपल्या लाडक्या भावांचे सरकार वाचले पाहिजे या पोटतिडकीने महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून आशीर्वाद दिले, असल्याचेही दरेकर म्हणाले.